मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ डिसेंबर २०२४
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु असलेल्या एका सोने तस्करीचा डीआरआयच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत सहाजणांना अटक करण्यात आली असून त्यात तीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कर्मचारी तर तीन रिसीव्हर्स असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत या अधिकार्यांनी साडेबारा किलो सोने जप्त केले असून त्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये आहे. विदेशातून आलेले सोने विमानतळाबाहेर आणून देण्याची जबाबदारी तिन्ही कर्मचार्यांवर होती.
विदेशातून मोठ्या प्रमाणात सोने तस्करी करुन ते सोने विमानतळाबाहेर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असलेल्या फुड कोर्टमधील कर्मचार्यांची मदत घेतली जात आहे. गेल्या काही महिन्यांत या टोळीने विदेशातून आणलेले कोट्यवधी रुरपयांचे सोने विमानतळाबाहेर आणले होते. आंतरराष्ट्रीय सोने तस्करी तस्करी करणारी ही टोळी कार्यरत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी या टोळीची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या टोळीचे तीन सदस्य विदेशातून आणलेले सोने विमानतळाबाहेर नेण्याचा प्रयत्न करत होते, याच दरम्यान त्यांना या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून सोने घेण्यासाठी आलेल्या तीन रिसीव्हर्सनाही नंतर ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यातील आठ पाऊचमध्ये या अधिकार्यांनी २४ अंडाकृती आकाराचे गोळे सापडले. साडेबारा किलो वजनाच्या या सोन्याची किंमत सुमारे दहा कोटी रुपये आहे.
तपासात तिन्ही कर्मचारी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध पदावर काम करत असून त्यांच्यावर सोने विमानतळावर आणून देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी करणारी ही एक टोळी कार्यरत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीने यापूर्वीही विदेशातून आणलेले सोने विमानतळाबाहेर काही रिसीव्हर्सना दिले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या सहाजणांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत डीआरआयच्या अधिकार्यांनी ३६ किलो सोने जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे २५ कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले.