मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – सोने तस्करी करणार्या एका महिला टोळीचा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी चार महिलांना या अधिकार्यांनी अटक केली असून या चारही महिलांनी नैरोबी येथून आणलेले चार कोटी चौदा लाख रुपयांचे ५ किलो २८५ ग्रॅम वजनाचे सोने या अधिकार्यांनी जप्त केले आहेत. त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सोने तस्करी करणारी एक विदेशी टोळी कार्यरत असून या टोळीतील काही महिला विदेशातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या अधिकार्यांनी नैरोबी येथून येणार्या प्रत्येक प्रवाशांची तपासणी सुरु केली होती. गुरुवारी चार महिला संशयास्पद विमानतळाबाहेर जाण्याच्या तयारीत होत्या. यावेळी या अधिकार्यांनी चारही महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्यासह त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या महिलांकडे ५१८५ ग्रॅम वजनाचे ४ कोटी १४ लाख रुपयांचे सोने सापडले. ते सोने त्यांनी त्यांच्या बुरख्याखाली घातलेल्या कपड्यांमधून लपवून आणले होते. सोने तस्करी केल्याप्रकरणी या चारही महिलांना नंतर या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.