आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्यासह हिरे तस्करीचा पर्दाफाश

९.१२ कोटीच्या मुद्देमालासह पाच प्रवाशांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्यासह हिर्‍यांच्या तस्करीचा सीआयएसएफसह हवाई गुप्तचर विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यात एका केनियन नागरिकाचा समावेश आहे. या प्रवाशांकडून ४ कोटी ९३ लाख रुपयांच्या हिर्‍यांसह २१४७ ग्रॅम वजनाचे सोने असा ९ कोटी १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ट्रॉली बॅगेसह लॅपटॉपच्या आड हिरे आणि सोन्याची तस्करीचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.

बुधवारी रात्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉंकला जाण्यासाठी भरत नावाचा एक प्रवासी आला होता. पहाटे तीन वाजता त्याचे विमान उड्डान होणार होते. विामनतळावर त्याची हालचाल संयशास्पद वाटताच त्याला सीआायएसएफच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू असल्याचे स्क्रिनरमधून दिसून आले. त्यानंतर या अधिकार्‍यांनी लॅपटॉपचय बॅटरी असलेल्या जागी लपवलेले हिरे जप्त केले. तिथे २६ पाकिट ठेवण्यात आले असून त्यात ते हिरे लपविण्यात आले होते. या कारवाईत या अधिकार्‍यांनी ४ कोटी ९३ लाख रुपयांचे हिरे जप्त केले होते. याच गुन्ह्यांत नंतर भरतला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन कस्टम विभागाच्या स्वाधीन केले होते. त्याच्याविरुद्ध हिरे तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या कारवाईत दुबईहून आंतररराष्ट्रीय विामनतळावर आलेल्या तीन प्रवाशांना कस्टम अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या तिघांसह त्यांच्या सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात ७७५ ग्रॅम वजनाचे २४ कॅरेट क्रुड रोडियम प्लेटेड रिंग्ज आणि बटणे सापडले. या सोन्याची किंमत ६१ लाख ४५ लाख रुपये इतकी आहेत. या तिघांनी बेल्ट बकल आणि ट्रॉली बॅगेत ते सोने लपवून आणले होते. तिसर्‍या कारवाईत या अधिकार्‍यांनी एका केनियन नागरिकाला अटक केली. हा नागरिक नैरोबीहून आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात २२ कॅरेटचे सोन्याचे बार आणि दागिने सापडले. तसेच त्याने त्याच्या अर्ंतवस्त्रात आणि कपड्याच्या खिशातही सोन्याचे बार आणि दागिने लपवून आले होते. त्याच्याकडून या अधिकार्‍यांनी २४०६ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची किंमत पावणेदोन कोटी रुपये इतकी आहेत. सोने तस्करीप्रकरणी या विदेशी नागरिकासह चारही प्रवाशांवर नंतर या अधिकार्‍यांनी कारवाई केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page