जेवणावरुन झालेल्या वादातून मेहुण्याची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत आरोपी भावोजीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – पत्नीसोबत जेवण बनविण्यावरुन झालेल्या वादातून सागर मनोज गुप्ता या 24 वर्षांच्या मेहुण्याची त्याच्याच भावोजीने तिक्ष्ण हत्याने भोसकून हत्या केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आकाश रामविलास मौर्या या आरोपी भावोजीला एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली आहे. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
ही घटना रविवारी रात्री एकच्या सुमारास विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे शास्त्रीनगर परिसरात घडली. याच परिसरात अनिता मनोज गुप्ता ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिची ममता ही मोठी मुलगी असून पाच वर्षापूर्वी तिचे आकाश मौर्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ते दोघेही त्यांच्या घराजवळच राहत होते. आकाशला दारु पिण्याचे व्यसन होते. या कारणावरुन ममता आणि आकाश यांच्यात नेहमी वाद होत होती. अनेकदा त्यांच्यात भांडणात अनिता, तिचे पती मनोज आणि मुलगा सागर हे तिघेही मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करत होते.
रविवारी रात्री दहा वाजता सागर हा ममताच्या घरी गेला होता. काही वेळानंतर अनिता ही सागरला जेवणासाठी बोलविण्यासाठी गेली होती. यावेळी अनिता, ममता आणि सागर यांच्यात चर्चा सुरु असताना काही वेळाने तिथे आाकाश आला. त्याने ममतला जेवण देण्यास सांगितले, यावेळी ममताने आज जेवण बनविले नाही असे सांगितले. त्याचा राग आल्याने आकाशने तिच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी सागरने आकाशला शिवीगाळ करु नकोस असे सांगितले. त्यातून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरु झाली होती. ममता ही माझी पत्नी आहे, मला जे वाटेल ते मी बोलेन, तू आमच्यात पडू नकोस, नाहीतर तुलाही सोडणार नाही अशी धमकी दिली होती.
या धमकीनंतर त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यामुळे अनिता आणि ममता यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्यांच्या हाणामारी झाली होती. त्यांनी एकमेकांना हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना बाजूला करुन आकाशने तिक्ष्ण हत्याराने सागरच्या मानेवर वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सांताक्रुज येथील व्ही. एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
तिथे उपचार सुरु असताना सागरचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्यासह एअरपोर्ट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अनिता गुप्ता हिची पोलिसंनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या जबानीनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आकाश मौर्या याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.