आंतरराष्ट्रीय विमानतळासह नायर हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी
दोन ठिकाणांची तपासणीनंतर बॉम्बची अफवा असल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 सप्टेंबर 2025
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह नायर हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा मॅसेज आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र दोन्ही ठिकाणांची बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने कसून तपासणी केली, मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहार आणि आग्रीपाडा पोलिसांनी बॉम्बस्फोट होणार असल्याचे बोगस मॅसेज पाठवून तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
शुक्रवारी रात्री उशिरा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एक मेल प्राप्त झाला होता. त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बस्फोट होणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या धमकीनंतर विमानतळावरील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु करण्यात आली होती.
दुसरीकडे या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत संपूर्ण विमानतळाची तपासणीचे आदेश जारी केले होते. या आदेशानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने विमानतळाची तपासणी सुरु केली होती. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरु होती. मात्र विमानतळावर कुठलाही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते.
ही घटना ताजी असताना मुंबई सेंट्रल येथील नायर हॉस्पिटलमध्ये अशाच प्रकारे एक मेल आला होता. त्यात हॉस्पिटलची इमारत बॉम्बस्फोटाने उडविणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या माहितीनंतर आग्रीपाडा पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकासह संपूर्ण हॉस्पिटल इमारतीची तपासणी केली होती, मात्र बराच वेळ शोधमोहीम हाती घेऊन तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे बॉम्बच तीदेखील अफवा असल्याचे उघडकीस आले.
या घटनेनंतर सहार आणि आग्रीपाडा पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. हा मेल कोठून आला, तो कोणी पाठविला याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. या दोन्ही घटनेने आंतरराष्ट्रीय विमानतळासह नायर हॉस्पिटलमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.