किरकोळ वादातून तरुणाला बोनोटवरुन काही अंतर फरफरत नेले
एअरपोर्ट येथील घटना; आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 मे 2025
मुंबई, – किरकोळ वादातून अस्लम मदार पठाण या कारचालकाला कारच्या बोनोटवरुन काही अंतर फरफरत नेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार एअरपोर्टवर उघडकीस आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच आरोपी कारचालकाविरुद्ध विमानतळ पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच भीमप्रसाद जानी महतो या कारचालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली.
32 वर्षांचा जस्टीन जयराज डिसुझा हा कल्याण येथे राहत असून चालक म्हणून काम करतो. सध्या तो ओला कंपनीसाठी काम करतो. 27 मेला रात्री अकरा वाजता तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. प्रवाशी भाड्यासाठी तो त्याची कार पार्किंगसाठी घेऊन जात होता. यावेळी गेटमधून कार नेताना एका दुसर्या कारने त्याच्या कारला पुढे जाण्यास न देत दाबण्याचा प्रयत्न केला. याच कारणावरुन आरोपी चालकासोबत त्याचे वाद झाला होता. या वादानंतर त्याने त्याला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने त्याची कार जवळच असलेल्या ठिकाणी पार्क केली होती.
याच दरम्यान तिथे आरोपी चालक आला आणि त्याने त्याच्यासह त्याचे मित्र अस्लम पठाण, सिबू, सुभाष पवार यांच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. वाद मिटल्यानंतर तो तेथून त्याची कार घेऊन जाण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी मदार पठाणने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याला धडक दिली. त्यामुळे तो त्याच्या कारच्या बोनोटवर पडला. यावेळी त्याने कार न थांबविता त्याला काही अंतर फरफरटत नेले होते. ही कार जोगेश्वरी येथे काही लोकांनी थांबविली असता अस्लम पठाण हा लगेचच बोनोटवरुन खाली उतरला होता. त्याला कुठलीही इजा झाली नव्हती.
मात्र विलेपार्ले-जोगेशवरी दरम्यान तो त्याला बोनोटवर घेऊन गेला होता. हा व्हिडीओ नंतर सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत संंबंधित चालकाविरुद्ध कारवाईचे आदेश विमानतळ पोलिसांना दिल होते. याच दरम्यान जस्टीन डिसुझा यांनी विमानतळ पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी चालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि वाहतुक कायदा कलमातर्गत गुन्हा दाखल केला होता.
तपासात आरोपी चालकाचे नाव भीमप्रसाद महतो असून तो ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक एक, विजयनगर, वर्तकनगरचा रहिवाशी आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. मंगळवारी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय विमातळाजवळ घडलेल्या या प्रकारामुळे इतर चालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.