आठ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अफगाणी नागरिकाला अटक
आबूधाबीला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – आठ वर्षांपासून मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या एका अफगाणी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली. दिलावर मोहम्मद अक्रम खान मेंजई ऊर्फ अली मेहमूद खान असे या नागरिकाचे नाव असून बोगस भारतीय पासपोर्टवर विदेशात प्रवास केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. टुरिस्ट व्हिसावर तो आबूधाबीला जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्याला इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले.
बापूराव दिलीप खांडेकर हे गोरेगाव येथे राहत असून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून काम करतात. तीन दिवसांपूर्वी ते काऊंट क्रमांक 25 वर कर्तव्य बजावत होते. त्यांच्यावर विदेशात जाणार्या प्रवाशांची इमिग्रेशन तपासणीचे काम होते. रात्री अकरा वाजता तिथे अली मेहमूद खान हा व्यक्ती आला होता. त्याने त्याचा भारतीय पासपोर्ट, युएईचा टुरिस्ट व्हिसासह इतर कागदपत्रे तपासणीसाठी दिले होते. त्याच्या तिकिटावरुन तो आबूधाबी येथे जात होता. त्याच्या पासपोर्टमध्ये अफगाणिस्तानचा व्हिसा होता. तो दोन वेळा अफगाणिस्तानला गेा होता. याबाबत त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाही. त्याच्या बोलण्यावरुन तो अफगाणी नागरिक असल्याचा संशय आल्याने त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्याने तो अफगाणी नागरिक असल्याची कबुली दिली. त्याचे पूर्वज अफगाणी नागरिक असून तो त्याच्या आई-वडिलांसोबत 2016 साली मेडीकल व्हिसावर भारतात आला होता. मुंबई शहरात वास्तव्यास असताना 2017 साली त्याने एका एजंटच्या मदतीने अली मेहमूद खान नावाने भारतीय पासपोर्ट बनविले होते. याच पासपोर्टवर तो 2002 आणि 2004 साली अफगाणिस्तानात गेला होता. त्यानंतर तो आबूधाबी येथे जाण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता, मात्र तिथे जाण्यापूर्वीच त्याला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले. अफगाणी नागरिक असताना त्याने बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवून विदेशात प्रवास केला होता.
हा प्रकार उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी बापूराव खांडेकर यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याला एका एजंटने बोगस भारतीय पासपोर्ट बनविण्यास मदत केली होती, त्यामुळे या एजंटचा आता पोलिसांकडून शोध सुरु आहे.