लैगिंक अत्याचारप्रकरणी अनिवासी भारतीयाला अटक
लग्नाच्या आमिषाने २७ वर्षांच्या तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – लैगिंक अत्याचारप्रकरणी एका ४० वर्षांच्या अनिवासी भारतीय व्यावसायिकाला एअरपोर्ट पोलिसांनी अटक केली. संकेत धीरजलाल पटेल असे या व्यावसायिकाचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने सोमवार ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विवाहीत असताना डेटिंग ऍपवरुन ओळख झालेल्या एका २३ वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार करुन तिची फसवणुक केल्याचा संकेत पटेल याच्यावर आरोप आहे.
२३ वर्षांची पिडीत तरुणी ही पुण्यात तिच्या आई-वडिल आणि भावासोबत राहते. तिच्या वडिलांसह भावाचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. गेल्या वर्षी तिची एका खाजगी डेटिंग ऍपवरुन संकेत पटेलशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांच्यात संभाषण सुरु झाले होते. यावेळी त्याने तो मूळचा गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी असून सध्या अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे सांगितले होते. तिथे त्याचा स्वतचा व्यवसाय आहे. गेली अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्यास असल्याने त्याला तेथील नागरिकत्व मिळाले होते. तो अनिवासी भारतीय असल्याचे त्याने तिला सांगितले होते. तो विवाहीत होता, मात्र त्याने तिला त्याचे अद्याप लग्न झाले नसून अविवाहीत असल्याचे सांगून त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तिला प्रपोज करुन नंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले होते. सतत एकमेकांच्या संपर्कात राहिल्यानंतर तिला त्याचा स्वभाव आवडला होता, त्यामुळे तिनेही त्याच्याशी लग्नासाठी होकार दर्शविला होता. गेल्या वर्षी जुलै महिन्यांत तो मुंबईत आला होता. यावेळी त्यांची सहार येथील जे. डब्ल्यू मेरीयट हॉटेलमध्ये पहिली भेट झाली होती.
या भेटीदरम्यान त्याने तिच्याशी जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. आपण लवकरच लग्न करु असे तो तिला सांगत होता. त्यामुळे तिने याबाबत कोणालाही काहीही माहिती दिली नाही. त्यानंतर ती त्याच्यासोबत विदेशात फिरायला गेली होती. तिथेही त्यांच्यात अनेकदा शारीरिक संबंध आले होते. या संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉडिंग केले होते. ते रेकॉडिंग दाखवून नंतर तो तिला ब्लॅकमेल करत होता. याच दरम्यान तिला संकेत पटेल हा विवाहीत असून त्याचे कुटुंबिय अमेरिकेत वास्तव्यास असल्याचे समजले होते. ही माहिती समजल्यानंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. लग्नाचे आमिष दाखवून संकेतने जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत मुंबईसह विदेशात शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न न करता तिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने तिच्या कुटुंबियांना ही माहिती सांगितली होती. यावेळी त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने एअरपोर्ट पोलिसांत संकेत पटेलविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच संकेत हा सध्या अहमदाबाद येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एअरपोर्ट पोलिसांच्या एका विशेष पथकाने अहमदाबाद येथून संकेत पटेल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याने लग्नाचे आमिष दाखवून पिडीत तरुणीवर लैगिंक अत्याचार केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.