अनुजकुमारची आत्महत्याच असल्याचे पीएम रिपोर्टवरुन उघड

सीसीटिव्ही फुटेज ताब्यात; संशयास्पद काही नसल्याचा दावा निपक्षपणे चौकशी होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३ मे २०२४
मुंबई, – एप्रिल महिन्यांत बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या घराजवळ गोळीबार केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुजकुमार ओमप्रकाश थापन याचा पीएम रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला आहे. या रिपोर्टमध्ये संशयास्पद काहीच सापडले नसून अनुजकुमार याने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आहे. त्यामुळे त्याच्या विसेरा रिपोर्टची आता मुंबई पोलिसांना प्रतिक्षा आहे. दरम्यान अनुजकुमारच्या आत्महत्येची निपक्ष चौकशी व्हावी, ही चौकशी जोपर्यंत होत नाही तोवर त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्राच त्याच्या कुटुंबियांनी घेतल्याने मुंबई पोलिसांपुढे नवीन पेच निर्माण झाला आहे.

१४ एप्रिलला सलमानच्या घराजवळ बाईकवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केूला होता. या गोळीबारानंतर अवघ्या दोन दिवसांनी विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल या दोघांना गुन्हे शाखेने सुरतच्या भूज येथून अटक केली होती. चौकशीदरम्यान त्यांनीच सलमानच्या घराजवळ गोळीबार केल्याची कबुली दिली होती. या दोघांच्या अटकेनंतर अनुजकुमारसह सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई या दोघांनाही पंजाब येथून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर गोळीबारासाठी शूटरला शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. अटकेनंतर या चारही आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने विकीकुमार, सागरकुमार आणि अनुजकुमार या तिघांना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती तर आजारी असलेल्या सोनूकुमारला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. पोलीस कोठडीत असलेल्या तिन्ही आरोपींना पोलीस मुख्यालयात कोठडीत ठेवण्यात आले होते. मंगळवारी ३० एप्रिलला अनुजने चादरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात त्याने आत्महत्या केल्याचे तसेच या आत्महत्येमागे घातपात नसल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीस कोठडीतील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर अनुजकुमार हा एकटाच बाथरुममध्ये जात असल्याचे दिसून आले आहे. त्याचा विसेरा पुढील तपासणीसाठी कानिा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला असून त्याचा रिपोर्ट लवकरच पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. लवकरच शवविच्छेदन अहवालासह पोलिसांचा तपास अहवाल विशेष मोक्का न्यायालयात पोलिसांकडून सादर केला जाणार आहे. दुसरीकडे अनुजकुमारच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्याची विनंती केली होती. तोपर्यंत त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page