मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
9 जुलै 2025
मुंबई, – सिनेअभिनेत्री आलिया भट्ट हिची फसवणुक केल्याप्रकरणी तिची माजी पीए वेदिका प्रकाश शेट्टी हिला मंगळवारी जुहू पोलिसांच्या एका विशेष पथकाने बंगलोर येथून अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत वेदिका सध्या पोलीस कोठडीत आहे. तिच्यावर आलिया भट्ट हिच्या बोगस स्वाक्षरी करुन बँक खात्यातून सुमारे 77 लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. याच फसवणुकीप्रकरणी तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बॉलीवूडमध्ये आलिशा भट्ट ही सध्याची आघाडीची सिनेअभिनेत्री आहे. तिच्याकडे वेदिका ही पीए म्हणून काम करत होती. तिच्यासोबत आलियाने दोन वर्षांसाठी करार केला होता. तिच्यावर तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. त्यात तच्यिा प्रोडेक्शन हाऊसच्या कामकाजाचाही समावेश होता.याच दोन वर्षांच्या कालावधीत वेदिकाने आलियाच्या बोगस स्वाक्षरीच्या माध्यमातून तिच्या बँक खात्यातून सुमारे 77 लाखांचा अपहार केला होता.
हा प्रकार कोणालाही समजू नये याची तिने पुरेपुर काळजी घेतली होती. दोन वर्षांचा करार संपल्यानंतर तिने आलियाची नोकरी सोडली होती. नोकरी सोडल्यानंतर ऑडिटदरम्यान फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी तिला तिच्या प्रोडेक्शन हाऊसकडून सतत कॉल करण्यात आला होता, मात्र तिने प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर आलियाची आई आणि सिनेअभिनेत्री सोनी राजदान हिने फेब्रुवारी महिन्यांत जुहू पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर वेदिकाविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून बँक खात्यातून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच तिचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना वेदिका ही बंगलोर शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली हातेी. या माहितीनंतर जुहू पोलिसांची एक टिम बंगलोरला गेली होती. या टिमने स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेदिका शेट्टी हिला तिच्या राहत्या घरातून अटक केली. ट्रॉन्झिंट रिमांडनंतर तिला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. मुंबईत येताच तिला फसवणुकीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला 10 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु केली आहे. तिने फसवणुकीची रक्कम कुठे गुंतवणुक केली आहे का, याकामी तिला कोणी मदत केली का, तिने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहे. तिची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.