अंबानीच्या शाही विवाह सोहळ्यात बॉम्बच्या मॅसेजने तणाव
गुजरात येथून मॅसेज पाठविणार्या आयटी इंजिनिअरला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ जुलै २०२४
मुंबई, – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळादरम्यान बॉम्बचा सोशल मिडीयावर मॅसेज व्हायरल करुन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी विरल कल्पेश आशरा या २४ वर्षांच्या आयटी इंजिनिअर तरुणाला दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यांतील मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला गिरगाव येथील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अविष्कार अशोक राऊत हे पोलीस शिपाई असून सध्या ते क्राफर्डमार्केट येथील वेब सेल कार्यालयात कार्यरत आहे. शनिवारी ते रात्रपाळीच्या ड्युटीवर हजर झाले होते. यावेळी त्यांना डुकरे २०२४ या ट्विटर अकाऊंटवरुन एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटरवर एक मॅसेज पाठविला होता. त्यात या व्यक्तीने माझे मन निर्लज्जपणे विचार करत आहे की उद्या अंबानीच्या लग्नात एका पिन कोडमध्ये ट्रिलियम डॉलर्सचा बॉम्ब फेकला गेल्यास अर्धे जग उलटून जाईल असा मॅसेज दिला होता. त्यानंतर अंबानी यांच्या बीकेसी येथे शाही विवाह सोहळ्याला मुंबई पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. दुसरीकडे या मॅसेजची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सायबर सेल पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३५१ (३), ३५३ (१), ३१९ (२) भारतीय न्याय संहिता सहकलम ६६ (क), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा सायबर सेलसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते.
तपासात आलेल्या तांत्रिक माहितीवरुन गुन्हे शाखेने गुजरात येथून विरल आशरा या २४ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा मॅसेज पाठविल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील मोबाईल हस्तगत केला. याच मोबाईलवरुन त्याने बोगस ट्विटर अकाऊंट उघडले होते. विरल हा आयटी इंजिनिअर असून गुजरातच्या वडोदरा शहराचा रहिवाशी आहे. त्याने सोशल मिडीयासह इंटरनेटचा गैरवापर करुन बोगस ट्विटर अकाऊंट ओपन करुन बॉम्बस्फोटाची धमकी देऊन, लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी सायबर सेल पोलिसांकडे सोपविण्यतात आले होते. याच गुन्ह्यांत त्याला मंगळवारी दुपारी गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.