मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – स्वस्तात व्यावसायिक गाळा देतो असे सांगून गाळ्यासाठी घेतलेल्या सुमारे ३७ लाखांचा अपहार करुन एका वयोवृद्ध महिलेची फसवणुक करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस अकरा महिन्यानंतर आंबोली पोलिसांनी अटक केली. वाहिद अब्दुल सत्तार गेहलोत असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या सोळा वर्षांपासून वाहिद हा तक्रारदार महिलेची फसवणुक करत होता, गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर त्याला गजाआड करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.
६२ वर्षांची सोनाली बेहरा ही वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरीतील शास्त्रीनगर, विंडसर टॉवर अपार्टमेंटच्या २१ व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २००१ मध्ये राहते. जानेवारी २००८ रोजी तिची वाहिद गेहलोतशी ओळख झाली होती. त्याने तिला अंधेरीतील न्यू लिंक रोड, स्टॅनफोर्ट प्लाझामध्ये एक व्यावसायिक गाळा स्वस्तात देण्याचे आश्वासन दिले होते. गुंतवणुक म्हणून तिने हा व्यावसायिक घ्यावा यासाठी तिला प्रवृत्त केले होते. त्यामुळे तिने कुटुंबियांशी चर्चा करुन हा व्यावसाकि गाळा खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच गाळ्यासाठी तिच्यासह तिच्या मुलाने वाहिदला टप्याटप्याने ३७ लाख ७० हजार रुपये झाला होता. या पेमेंटनंतर त्यांच्या गाळ्याचे रजिस्ट्रेशन करण्याचे ठरले होते. मात्र त्याने दिलेल्या मुदतीत गाळ्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. तसेच गाळाचा ताबा दिला नव्हता. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना गाळ्याचा ताबा देत नव्हता.
त्याचा व्यवहार न पटल्याने त्यांनी त्याच्याकडे गाळ्यासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र पैसे न देता तो पळून गेला होता. जानेवारी २००८ साली झालेल्या व्यवहारानंतर तब्बल सोळा वर्ष उलटूनही त्याने गाळ्याचा ताबा आणि गाळ्यासाठी घेतलेले पैसे परत परत केले नव्हते. त्यामुळे जानेवारी २०२४ रोजी सोनाली बेहरा हिने आंबोली पोलिसांत वाहिद गेहलोत याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या अकरा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या वाहिदला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाहिदने अशाच प्रकारे या गाळ्याचा इतर कोणाशी व्यवहार करुन फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.