भिसीमधील गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने फसवणुक
महिलेसह तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ डिसेंबर २०२४
मुंबई, – भिसीमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका व्यावसायिकाची तिघांनी १ कोटी ८० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कामाक्षी उडायार, विनोद उडायार आणि दिनेशकुमार केशरवानी अशी या तिघांची नावे आहेत. फसवणुकीच्या या गुन्ह्यांत लवकरच या तिघांची चौकशी होणार आहे.
कुमार वेट्टपेरीमल मल्लार हे अंधेरीतील डी. एन नगर, गणेश चौक, विघ्वहर्ता सोसायटीमध्ये राहत असून ते व्यावसायिक आहेत. तिन्ही आरोपी त्यांच्या परिचित असून ते तिघेही भिसीमध्ये पैसे गुंतवणुक करतात. हा संपूर्ण आर्थिक व्यवहार अंधेरीतील न्यू लिंक रोड, आरटीओजवळील अन्नानगरात चालतो. या तिघांनी त्यांनाही भिसीमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परवाता देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी तिघांच्या सांगण्यावरुन ऑक्टोंबर २०२२ ते मे २०२४ या कालावधीत १ कोटी ८० लाखांची गुंतवणुक केली होती. त्यापैकी १ कोटी ५६ लाख ५५ हजार ६१७ रुपये कॅश तर २३ लाख २४ हजार ६१७ रुपये बँकेत ट्रान्स्फर करण्यात आले होते. मात्र ही रक्कम गुंतवणुक करुनही त्यांना तिघांनी चांगला परतावा दिला नाही. वारंवार विचारणा करुनही त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
या तिघांकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी गुंतवणुक केलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी त्यांना मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी कामाक्षी, विनोद आणि दिनेशकुमार या तिघांविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काहींना भिसींमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले आहेत, त्यांची फसवणुक झाली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.