मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2025
मुंबई, – नवी मुंबईतील डी. वाय पाटील मेडीकल कॉलेजमध्ये सुरु असलेल्या क्लिनिकल रिसर्चमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका 47 वर्षांच्या व्यक्तीची सुमारे नऊ कोटीची फसवणुक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहनिला अहतीशाम सय्यद या महिला डॉक्टरविरुद्ध आंबोली पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून तिच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तिने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
शैरा अहमद खान हे अंधेरीतील न्यू लिंक रोड, सिटीमॉलसमोरील गल्ली, ओबेरॉय स्प्रिंग अपार्टमेंटमध्ये राहत असून ते व्यावसायिक आहेत. ऑक्टोंबर 2023 रोजी त्यांची शहनिला सय्यद या महिलेशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. तिने त्यांना ती डॉक्टर असून ती कॅन्सर रोगावरील उपचारासाठी नवी मुंबईतील डी. वाय पाटील कॉलेजमध्ये क्लिनिकल रिसर्च करत आहेत. या क्षेत्रात अनेकांनी गुंतवणुक केली असून त्यांना चांगला परतावा मिळत आहे. त्यामुळे त्यांनी तिच्या क्लिनिक रिसर्चसाठी गुंतवणुक करावी. या गुंतवणुकीवर त्यांना दुप्पट रक्कमेसह दरमाह चार ते पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी तिला 30 ऑक्टोंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दहा कोटी पंचवीस रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते. ही रक्कम तिच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. काही महिन्यानंतर तिने त्यांना एक कोटी अठरा लाख रुपये परतावा म्हणून दिले होते. मात्र नंतर तिने परताव्याची रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिच्याकडे विचारणा सुरु केली होती. मात्र तिच्याकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. ती त्यांच्या कॉलही प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे गुंतवणुक केलेली रक्कम परत करण्यास सांगितले. मात्र तिने पैसे परत न करता त्यांची फसवणुक केली होती.
क्लिनिकल रिसर्चसाठी सव्वादहा कोटी रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तिने एक कोटी अठरा लाख रुपये परत करुन उर्वरित नऊ कोटी सात लाखांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी आंबोली पोलिसात शहनिला सय्यदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. शहनिला ही जोगेश्वरीतील बेहरामबाग, सुल्ताना अपार्टमेंटमध्ये राहत असून तिला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.