खुश करण्यासाठी घरी आलेल्या महिलांकडून हातसफाई

नऊ लाखांचा मुद्देमाल चोरी दोन्ही महिलांचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 मे 2025
मुंबई, – खुश करण्यासाठी आलेल्या दोन महिलांनी एका निवृत्त वयोवृद्ध बँक अधिकार्‍याच्या घरी हातसफाई करुन सुमारे नऊ लाखांचा मुद्देमाल पळवून नेल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. चोरीनंतर पळून गेलेल्या दोन्ही महिलांविरुद्ध आंबोली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. रंजना पवार आणि सुनिता कांबळे अशी या दोन महिलांची नावे आहेत. त्या दोघीही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

73 वर्षाचे तक्रारदार अंधेरी येथे राहत असून ते एका नामांकित बँकेतून तर त्यांची पत्नी जीएसटी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या आहेत. या दोघांनाही पेंशन मिळत असून याच पेंशनमधून त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालतो. ते रंजना पवारला गेल्या सात वर्षांपासून ओळखतात. 1 मेला तिने त्यांना फोन करुन तिची आई हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहे. त्यामुळे तिला दोन हजाराची तातडीने गरज आहे. यावेळी त्यांनी तिला चॅरीटेबल हॉस्पिटलची लिस्ट पाठवून तेथून मदतीसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता. 17 मे ते 22 मे 2025 या कालावधीत त्यांची पत्नी त्यांच्या सिंधुदुर्ग येथील कुडाळ गावी गेली होती. यावेळी रंजनाने त्यांना कॉल करुन सुनिता कांबळे या महिलेची माहिती देऊन तिचा फोटो पाठविला होता. ती त्यांच्या घरी येईल आणि त्यांना खुश करेल. त्यासाठी तिला दोन हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला व्हॉटअपवर त्यांच्या घरचा पत्ता पाठविला होता.

ठरल्याप्रमाणे 20 मेला सकाळी सव्वाअकरा वाजता रंजना ही सुनितासोबत त्यांच्या घरी आली होती. यावेळी ते त्यांच्याशी गप्पा मारत होते. याच दरम्यान त्यांच्या पत्नीने घरगुती सामान येणार असल्याचे सांगून त्यांना इमारतीखाली जाऊन ते सामान घेण्यास सांगितले होते. त्यामुळे दुपारी सव्वाबारा वाजता ते सामान आणण्यासाठी इमारतीखाली गेले होते. काही वेळानंतर ते घरी आले. यावेळी सुनिताला अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तिची मुलगी पडली असून तिला दुखापत झाल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी तिला पाचशे रुपये दिले. त्यानंतर त्या दोघीही तेथून निघून गेल्या. काही वेळानंतर त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील 79 हजाराची कॅश, 342 ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने आर्टिफिशियल नेकलेस असा नऊ लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.

सामान आणण्यासाठी इमारतीखाली गेल्यानंतर सुनिता आणि रंजनाने कपाटातील सोन्याचे दागिने आणि कॅशवर हातसफाई केली होती. त्यानंतर त्या दोघीही तेथून पळून गेल्या होत्या. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी घडलेला प्रकार आंबोली पोलिसांना सांगून या दोघीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रंजना पवार आणि सुनिता कांबळे या दोघींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page