मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 मार्च 2025
मुंबई, – होळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत एका मालिका अभिनेत्रीचा तिच्याच सहकर्मचार्याने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी तक्ष नारायण या कर्मचार्याविरुद्ध आंबोली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. तक्रारदार अभिनेत्री आणि आरोपी एकाच खाजगी चॅनेलमध्ये कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
29 वर्षांची तक्रारदार मालिका अभिनेत्री असून ती सध्या मालाड येथील मढ परिसरात राहते. गेल्या तीन वर्षांत तिने काही हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती अंधेरीतील एका चॅनेलसाठी काम करत असून या चॅनेलचे कार्यालय अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमध्ये आहे. शुक्रवारी 14 मार्चला या कार्यालयात होळी सणानिमित्त सर्व कार्यालयीन कर्मचार्यासाठी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत ती तिच्या काही मित्रांसोबत आली होती. पार्टीत तिचा सहकर्मचारी तक्ष नारायण याने प्रचंड मद्यप्राशन केले होते.
दुपारी साडेतीन वाजता तो इतर महिलांना रंग लावण्याचा प्रयत्न करत होता, त्यानंतर तो तिच्याजवळ आला, मात्र तिने त्याला रंग लावण्यास मनाई केली होती. त्यानंतर ती तेथून दुसरीकडे निघून गेली होती. काही वेळानंतर तक्ष तिथे आला आणि त्याने पुन्हा तिला रंग लावण्याचा प्रयत्न केला होता. रंग लावताना त्याने तिला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुला रंग लावण्यापासून मला कोण अडवतो तेच बघतो असे सांगून त्याने तिच्या टी शर्टमध्ये हात घालून नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार तिच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्यांच्याशी धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली होती.
या प्रकारानंतर तिने आंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी सहकर्मचारी तक्ष नारायण याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.