मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – कौटुंबिक वादानंतर विभक्त राहणार्याचा निर्णय घेणार्या पत्नीला आक्षेपार्ह मॅसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याचा तक्रारदार पत्नीने करुन पतीविरुद्ध आंबोली पोलिसांत तक्रार केली आहे. याप्रकरणी स्वप्नीत नावाच्या आरोपी पतीविरुद्ध आंबोली पोलिसांनी विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. पत्नीला आक्षेपार्ह मॅसेज पाठविणे त्याला चांगलेच महागात पडणार आहे.
42 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरीतील विरा देसाई रोडवर तिच्या आईसह मुलासोबत राहते. ती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तिचे पतीसोबत कौटुंबिक वाद होते, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या दहा वर्षांपासून ती तिच्या पतीपासून वेगळी राहत आहे. 2021 रोजी तिने तिच्या पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची एक केस केली होती. मात्र मुलाच्या भविष्याचा विचार करुन तिने 2024 ही केस मागे घेतली होती. त्यामुळे तिने कोर्टात एक संमतीपत्र तयार करुन सादर केले होते. त्यानंतर तिच्या पतीने तिला दरमाह पंधरा हजार रुपये देण्याचे मान्य केले होते. मात्र त्याने तिला पंधरा हजार रुपये दिले नव्हते. त्यासाठी ती त्याच्याकडे सतत पाठपुरावा करत होती. मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नव्हता.
रविवारी 23 फेब्रुवारीला सायंकाळी त्याने तिला एक मॅसेज पाठविला होता. त्यात त्याने तिला उद्देशून अश्लील व आक्षेपार्ह शिव्याचा उल्लेख केला होता. तसेच तिला बघून घेण्याची धमकी दिली होती. या प्रकाराने तिला मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने पतीविरुद्ध आंबोली पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल तिच्या पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.