गाडीची काच फोडून चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

तीन आरोपींना चोरीच्या मुद्देमालासह अटक; 18 गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – गाडीची काच फोडून आतील लॅपटॉप, मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करणार्‍या एका आंतरराज्य टोळीचा आंबोली पोलिसांनी पर्दाफाश केला. महेश ऊर्फ गौतम व्यकंटेश नायडू, जयकुमार विल्सनी आणि सदा विरमणी नायडू अशी या तिघांची नावे असून ते तिघेही दिल्ली आणि तामिळनाडूचे रहिवाशी आहेत. या तिघांकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्या अटकेने अठराहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्यकंटसिवा श्रीकांत पंडिरिपल्ली हे नवी मुंबईतील घनसोलीचे रहिवाशी आहेत. नवी मुंबईतील एका नामांकित कंपनीत ते उपाध्यक्ष म्हणून काम करतात. 29 जानेवारीला ते त्यांच्या कारमधून अंधेरीतील न्यू लिंक रोड, सब टिव्ही लेन परिसरात त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी आले होते. ही कार त्यांनी सब टिव्ही लेन, अनुग्रह ज्वेलर्स शॉपसमोरच पार्क केली होती. मित्रासोबत जेवण करुन ते त्यांच्या कारजवळ आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या कारची अज्ञात व्यक्तीने काच फोडून नुकसान केले होते. कारमधील त्यांचा लॅपटॉप, बॅग, लॅपटॉप आणि आयफोनचे दोन चार्जर असा 92 हजाराचा मुद्देमाल चोरी केल्याचे दिसून आले.

हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी आंबोली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गेल्या काही महिन्यांत मुंबई शहरात पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील सामान चोरी करणारी एक टोळी सक्रिय झाली होती, याबाबत काही तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यामुळे त्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंग दहिया, पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत काटकर यांनी गंभीर दखल घेत आंबोली पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे, पोलीस निरीक्षक सचिन बडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप रामकिसन फुंदे, सहाय्यक फौजदार गोरखनाथ भिकू पवार, पोलीस हवालदार शिल्पेश विजय कदम, यादव गुलाबराव मोरे, पोलीस शिपाई राजेंद्र शिवाजी चव्हाण, योगेश संजीवन नरळे यांनी तपास सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने भिवंडी रोड, ठाणेपर्यंत आरोपींचा पाठलाग करुन तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा नव्वद हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यातील महेश नायडू आणि जयकुमार विल्सनी हे दोघेही दिल्ली तर सदा नायडू हा तामिळनाडूच्या सेलमचा रहिवाशी आहे. सदाविरुद्ध कळंबोली गुन्हे शाखा, कळंबोली आणि खारघर पोलीस ठाण्यात चार गुन्ह्यांची नोंद आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून आतील लॅपटॉप, मोबाईल व इतर मौल्यवान वस्तू चोरी करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघडकीस आले.

त्यांच्या अटकेने अशाच अठराहून गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात काशिमिरा पोलीस ठाण्यातील पाच, पनवेल पोलीस ठाण्यात तीन, आंबोली, पवई पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, नायगाव, खार, जुहू, बांगुरनगर, ओशिवरा, रबाळे, पोलीस ठाणतील प्रत्येकी एक अशा एकूण दहा पोलीस ठाण्यातील अठरा गुन्ह्यांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर या तिघांनाही बुधवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page