नांदायला येत नाही म्हणून पत्नीची चाकूने भोसकून हत्या

हत्येच्या गुन्ह्यांत रिक्षाचालक असलेल्या पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 मार्च 2026
मुंबई, – नांदायला येत नाही म्हणून रागाच्या भरात पंचभिला राजेश छत्रे या 38 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने चाकूने भोसकून हत्या केली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच रिक्षाचालक असलेल्या आरोपी पती राजेश एकनाथ छत्रे (46) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून तो पत्नीच्या हत्येच्या उद्देशाने शनिवारी अंधेरी परिसरात आला होता असे तपासता उघडकीस आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले.

ही घटना शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अंधेरीतील सागबाग रोड, आराध्या हॉस्पिटलसमोर घडली. पंचभिला आणि राजेश हे दोघेही पती-पत्नी असून त्यांना वीस आणि अठरा वर्षांची दोन मुले आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. याच वादातून त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून पंचभिला तिच्या दोन मुलांसोबत साकिनाका परिसरात राहत होती तर राजेश हा ठाण्यात वास्तव्यास होता. सध्या तो रिक्षाचालक म्हणून काम करत होता. पंचभिलाने पुन्हा नांदायला यावे यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र अनेकदा संधी देऊनही त्याच्यात काहीही सुधारणा झाली नव्हती, त्यामुळे तिने त्याच्यासोबत नांदायला नकार दिला होता.

त्याच्या राजेशच्या मनात राग होता. नांदायला येते की नाही हे तिला शेवटचे विचारायचे नाहीतर तिचा कायमचा काटा काढायचा याच उद्देशाने शनिवारी सायंकाळी राजेश हा आराध्या हॉस्पिटलजवळ आला होता. तिथेच त्याची पंचभिलाशी भेट झाली होती. त्याने तिला सर्व वाद संपवून पुन्हा नांदायला येण्याची विनंती केली होती. मात्र तिने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला होता. त्याचा राग आल्याने त्याने त्याच्यासोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या राजेशला स्थानिक लोकांनी पकडले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांनी दिली. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांच्यासह त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी साहिल रियाज लोखंडे या रिक्षाचालकाच्या जबानीवरुन पोलिसांनी राजेश छत्रे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर रविवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पत्नी नांदायला येत नाही म्हणून राजेशने ही हत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page