मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ मार्च २०२४
मुंबई, – कथित खिचडी घोटाळाप्रकरणी वायव्य मुंबईतून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल गजानन किर्तीकर यांना ईडीकडून दुसर्यांदा चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस बजाविण्यात आली आहे. २४ मार्चला चौकशीसाठी वेळ मागितल्यानंतर येत्या ८ एप्रिलला अमोल किर्तीकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ते चौकशीसाठी हजर राहणार की नाही याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोना काळात महानगरपालिकेने स्थालांरीत परप्रांतियांसाठी खिचडीचे वाटप केले होते. या खिचडी वाटपात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. या भष्ट्राचाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात अमोल किर्तीकर यांच्यासह इतर काही राजकीय नेत्यासह महानगपालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्यांचे नावे समोर आली होती. त्यामुळे या सर्वांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात अमोल किर्तीकर यांचीही पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या घोटाळ्यात मनी लॉड्रिंग झाल्याचे उघडकीस येताच संबंधित आरोपीविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. अमोल किर्तीकर यांना घोटाळ्यातील काही रक्कम मिळाली होती. त्यामुळे त्यांना २७ मार्चला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले होते. मात्र अमोल किर्तीकर यांनी चौकशीला हजर न राहता त्यांच्या वकिलांच्या मदतीने ईडी अधिकार्यांकडे वेळ मागून घेतला होता. त्यानंतर त्यांना ईडीने आता दुसरे समन्स बजाविले असून त्यात त्यांना ८ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे येत्या ८ एप्रिलला अमोल किर्तीकर चौकशीसाठी हजर राहतील की आणखीन काही दिवसांची मुदत मागून घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २८ मार्चला उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजाविले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.