रिचार्जच्या बहाण्याने लोन घेऊन आर्मी अधिकार्यांची फसवणुक
५.७० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० ऑगस्ट २०२४
मुंबई, – रिचार्जच्या बहाण्याने लोन प्राप्त करुन एका आर्मीच्या नायब सुभेदाराची अज्ञात सायबर ठगाने ५ लाख ७० हजार रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याची घटना सांताक्रुज परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
सतीश देवीसिंग चंद हे सांताक्रुज येथील कालिना मिलिटरी कॅम्प परिसरात राहत असून आर्मीमध्ये नायब सुभेदार या पदावर काम करतात. सतीश हे मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवाशी असून तेथील एका बँकेत त्यांचे बचत खाते आहे. मंगळवारी २७ ऑगस्टला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्यांचा मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याचे सांगून त्यांना तातडीने दहा रुपयांचे रिचार्ज करावे असे सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन दहा रुपयांचा रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून रिचार्ज झाला नाही. दुसर्या दिवशी त्यांना पुन्हा अन्य एका व्यक्तीचा फोन आला. त्याने त्यांचा रिचार्ज झाला नसून तो देत असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन रिचार्ज करा असा दिला. त्यामुळे त्यांनी दिलेल्या मोबाईलवर रिचार्जसाठी कॉल केला होता. मात्र त्यांचा रिचार्ज झाला नाही. याच दरम्यान त्यांच्या मोबाईलवर सत्तर हजार रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज आला होता. त्यांनी बँक खात्याची माहिती तपासली असता त्यात सत्तर हजार रुपये डेबीट झाले नसल्याचे दिसले. मात्र त्यांच्या खात्यात साडेसहा लाख रुपये लोन मंजूर झाल्याचा मॅसेज आला होता. त्यात लोन क्रमांकासह ब्रॅचकोडचा समावेश होता. त्यानंतर काही वेळानंतर त्यांना पाच लाख रुपये आरटीजीएस झाल्याचा एक मॅसेज आला होता. तसेच आधी मॅसेज आल्याप्रमाणे त्यांच्या खात्यातून सत्तर हजार रुपयेही डेबीट झाले होते.
अशा प्रकारे त्यांच्या बँक खात्यातून ५ लाख ७० हजार रुपये डेबीट झाले होते. अज्ञात सायबर ठगाने त्यांच्या नावाने लोन प्राप्त करुन लोनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होताच ऑनलाईन ५ लाख ७० हजार रुपये काढून त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा वाकोला पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.