मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या सातजणांच्या एका टोळीला मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी सव्वाकोटीचे हेरॉईन आणि बारा लाखांचे एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यांत त्यांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाड आणि वसई येथे काहीजण हेरॉईन या ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कांदिवली युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी चार आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ३१० ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत सुमारे सव्वाकोटी रुपये आहे. ही कारवाई सुरु असतानाच वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्सच्या अधिकार्यांनी कुर्ला येथून तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी बारा लाखांचे साठ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या सातही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले, ड्रग्ज ते कोणाला विक्रीसाठी आणले होते. यापूर्वीही त्यांनी ड्रग्जची खरेदी-विक्री केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.
२०२४ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने आतापर्यंत २४ गुन्हे दाखल करुन ६२ आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून ३४ किलो ५०० ग्रॅम वजनाचे विविध ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. त्यात १२०० कोडेनमिश्रीत कफ सिरप बॉटल्सचा समावेश आहे. या ड्रग्जची किंमत ३१ कोटी ६४ लाख रुपये इतकी आहे. चालू वर्षांत पोलिसांनी हेरॉईन तस्करीच्या तीन गुन्ह्यांची नोंद करुन आठ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ किलो १३८ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले असून त्याची किंमत ४ कोटी २२ लाख रुपये आहे. तसेच एमडी ड्रग्ज तस्करीत सोळा गुन्हे दाखल करुन ४६ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २२ कोटी ९२ लाखांचा साडेअकरा किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे.