शहरात एमडी ड्रग्जप्रकरणी मुंबई पोलिसांची धडक कारवाई
सहा आरोपींकडून 1.34 कोटीचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 डिसेंबर 2025
मुंबई, – शहरात एमडी ड्रग्जप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नारकोटीक्स सेलने चार वेगवेगळ्या कारवाईत सहा आरोपींना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 557 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1 कोटी 34 लाख 85 हजार रुपये इतकी आहेत. या सर्वांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत एमडी ड्रग्जला प्रचंड मागणी होत असल्याने या ड्रग्जच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध मुंबई पोलिसांच्या स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, एटीएस आणि अॅण्टी नारकोटीक्स सेलने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गोरेगाव येथील दिडोंशी परिसरात आलेल्या एका आरोपीला कांदिवली युनिटने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 230 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची किंमत 57 लाख 50 हजार रुपये इतकी आहे. दुसर्या कारवाई वांद्रे युनिटच्या अधिकार्यांनी वांद्रे येथून एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना 105 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत पावणेसोळा लाख रुपये आहे.
तिसर्या घटनेत आझाद मैदान युनिटने गोरेगाव येथे साध्या वेशात पाळत ठेवून दोन संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 36 लाख 60 हजार रुपयांचे 122 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. ते दोघेही गोरेगाव परिसरात एमडीची विक्रीसाठी आले होते. चौथ्या कारवाईत वरळी युनिटने धारावी परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी शंभर ग्रंम वजनाचे एमडी जप्त केले असून त्याची किंमत 25 लाख रुपये इतकी आहेत.
अशा प्रकारे चार वेगवेगळ्या ठिकाणी कांदिवली, वांद्रे, वरळी आणि आझाद मैदान पोलिसांनी एमडी ड्रग्जची विक्रीसाठी आलेल्या सहा आरोपींना अटक केली. या आरोपींकडून 1 कोटी 34 लाख 85 हजार रुपयांचे 557 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या सहाही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते ड्रग्ज कोणी दिले होते, ते कोणाला देण्यासाठी तिथे आले होते. त्यांनी यापूर्वीही ड्रग्जची तस्करी केली आहे का, त्याचे इतर कोणी सहकारी आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल चंदनशिवे, आझाद मैदानचे प्रभारी पोलीस निरीक्षक शैलेश सूर्यवंशी, वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे व त्यांच्या पथकाने केली.