मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सहा वेगवेगळ्या कारवाईत मुंबई पोलिसांच्या अॅण्टी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी सुमारे सात कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यात कोकेन, एमडी आणि ड्रग्जमिश्रीत गोळ्यांचा समावेश आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी नऊ आरोपींना अटक केली असून त्यात एका नायजेरीयन नागरिकाचा समावेश आहे. या सर्व आरोपींविरुद्ध एनडीपीएस कलमातंर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि अॅण्टी नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही कारवाई सुरु असताना सांताक्रुज येथे काही विदेशी नागरिक कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवारी रात्री उशिरा सांताक्रुज येथे आलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना 523 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. त्याची किंमत सव्वापाच कोटी रुपये इतकी आहे.
दुसर्या घाटकोपर युनिट कार्यालयात दाखल असलेल्या गुन्ह्यांतील तीन वॉण्टेड आरोपींना पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली होती. या आरोपींकडून पोलिसांनी 24 हजार 900 ड्रग्जमिश्रीत गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत सव्वाकोटी रुपये इतकी आहे. याच गुन्ह्यांत आतापर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 1 कोटी 35 लाख रुपयांचे ड्रग्जमिश्रीत गोळ्यांचा साठा जप्त केला आहे.
अन्य कारवाईत कुर्ला येथील सीएसटी, माझगाव, भायखळा येथील घोडपदेव, बोरिवली परिसरातून दपोलिसांनी पाच ड्रग्ज तस्करांना अटक केली होती. ते पाचजण एमडी ड्रग्ज डिलीव्हरीसाठी आले होते, मात्र ड्रग्ज डिलीव्हरी करण्यापूर्वीच या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 211 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 54 लाख 65 हजार रुपये इतकी आहे.
एकूण सहा कारवाईत पोलिसांनी 523 ग्रॅम वजनाचे कोकेन, 211 ग्रॅम वजनाचे एमडी आणि 24 हजार 900 ड्रग्जमिश्रीत गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे सात कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी एका नायजेरीयन नागरिकासह नऊ आरोपीविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.