अंधेरीतील त्या व्यक्तीचा मृत्यू अपघाती असल्याचे उघड
साडेसहा वर्षांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – अंधेरी रेल्वे स्थानकात बेवारस सापडलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू अपघाती असल्याचे साडेसहा वर्षांनी उघडकीस आले आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ओंकार चंद्रकात मगदुम हे माहीम पोलीस वसाहतीत राहत असून अंधेरी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. प्रथम चौकशी पथकात त्यांची पोस्टिंग आहे. २८ जून २०१८ रोजी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ एक आजारी इसम पडला असून त्याला पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाला होता. ही माहिती कंट्रोल रुममधून प्राप्त होताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे पोलिसांना एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे दिसला होता. त्यामुळे त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असतानाच ३० जून २०१८ रोजी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला होता. प्राथमिक तपासात मृत व्यक्तीचे नाव बादशहा असल्याचे उघडकीस आले होते. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू रस्तात अपघातात झाल्याचे उघडकीस आले होते. तसा अहवाल डॉक्टरांकडून देण्यात आला होता.
हा अहवाल नंतर सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या आदेशावरुन अंधेरी पोलिसांना अपघाताची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. यावेळी त्यांच्या वतीने ओंकार मगदुम यांनी अंधेरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातानंतर तब्बल साडेसहा वर्षांनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.