मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ जानेवारी २०२५
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका डंपरच्या धडकेने ३८ वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. मुस्कान मैनुद्दीन सय्यद असे या मृत महिलेचे नाव असून अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळाहून पलायन केले होते. याप्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी हलगर्जीपणाने डंपर चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
हा अपघात शनिवारी २५ जानेवारीला सकाळी सव्वासात वाजता अंधेरीतील महाकाली गुंफा, कणाकिया वॉल स्ट्रिटजवळील जे. के ट्रेडर्ससमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मैनुद्दीन इक्बाल सय्यद हे अंधेरीतील शेरे-ए-पंजाब, हिल्टन टॉवर अपार्टमेंटमध्ये त्यांची पत्नी मुस्कान, मुलगा दिशांत, रुमीना आणि वयोवृद्ध आई बशीर उनिसा यांचसोबत राहतात. शनिवारी सकाळी त्यांना त्यांच्या बहिणीचा फोन आला होता. यावेळी तिने त्यांच्या ऍक्टिव्हा बाईकचा अपघात झाला झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी तिने दिलेल्या पोलिसांच्या मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी संबंधित पोलिसाने डंपर अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून तिला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
या माहितीनंतर ते कूपर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे त्यांना त्यांची पत्नी मुस्कान हिचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजले. मुस्कान ही शनिवारी सकाळी त्यांच्या ऍक्टिव्हा बाईकने मुलीला कनोसा हायस्कूलमध्ये सोडण्यासाठी गेली होती. ही बाईक जे. के ट्रेडर्ससमोर येताच एका भरवेगात जाणार्या डंपरने ऍक्टिव्हा बाईकला जोरात धडक दिली होती. त्यात मुस्कानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघातानंतर डंपरचालक तिला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे मैनुद्दीन सय्यद यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.