मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 मे 2025
मुंबई, – जेसीबीच्या धडकेने विजय विश्वराम पुजारी या 42 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी जेसीबी चालक सुरज रमेशकुमार रावत याला अटक केली आहे. हा अपघात गुरुवारी 8 मेला अंधेरीतील विरा देसाई रोड, डॉमोनिज पिझ्झा शॉपसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
विजय पुजारी हे अंधेरी परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गुरुवारी दुपारी बारा वाजता ते कामानिमित्त विरा देसाई रोडवरुन पायी चालत जात होते. डॉमोचिज पिझ्झा शॉपसमोरुन जात असताना मागून जाणार्या एका जेसीबीने त्यांना जोरात धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या विजय पुजारी यांना तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.
याप्रकरणी आंबोली पोलिसांनी आरोपी जेसीबी चालक सुरज रावत याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने जेसीबी चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.