मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – कामावरुन घरी जाताना भरवेगात जाणार्या एका टेम्पोच्या धडकेने चंदा सदाशिव माने या 33 वर्षाच्या तरुणीचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपी टेम्पोचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता अंधेरीतील जोगेश्वरी-विकोळी लिंक रोड, वेदांत पेट्रोलपंपाजवळील जोगेश्वरीकडे जाणार्या वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यज्ञेश सदाशिव माने हा जोगेश्वरीतील मेघवाडी, गुलाम मोहम्मद चाळीत राहत असून मृत चंदा ही त्याची मोठी बहिण आहे. चंदा ही बीकेसी येथील सीएनडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामाला होती. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली होती. सायंकाळी तिला तिच्या कार्यालयातून विक्रोळीतील साईटवर पाठविण्यात आले होते. तेथील काम संपल्यानंतर ती तिच्या स्कूटीवरुन घराच्या दिशेने जात होती.
तिची स्कूटी वेदांत पेट्रोपपंपाजवळील जोगेश्वरीकडे जाणार्या वाहिनीवर आली असता एका भरवेगात जाणार्या टेम्पोने तिच्या स्कूटीला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता टेम्पोचालक तेथून पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या चंदाला तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल कर्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती नंतर पोलिसाकडून यज्ञेशला देण्यात आली होती. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी टेम्पोचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून त्याच्या बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपी चालक पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.