मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑगस्ट 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका टँकरच्या धडकेने माघीबेन रामजी पटेल या 63 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर तिचा पती रामजी अंबाजी पटेल (62) हे गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अपघातानंतर आरोपी टँकरचालक घटनास्थळाहून पळून गेला आहे. मात्र टँकरचा क्रमांक प्राप्त झाल्याने पळून गेलेल्या चालकाचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.
हा अपघात शुक्रवारी 1 ऑगस्टला सकाळी पावणेबारा वाजता अंधेरीतील विजयनगरवरुन सिप्झकडे जाणार्या रोडवर, पासपोर्ट कार्यालयाजवळ झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रामजी पटेल हे विलेपार्ले येथील नानावटी हॉस्पिटलजवळील रिषभ टॉवरमध्ये राहतात. त्यांच्या मालकीचे कॉस्मेटीक दुकान असून मृत माघीबेन ही त्यांची पत्नी आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता ते त्यांच्या पत्नीसोबत आरे कॉलनीतील तपेश्वर मंदिराच्या शंकर मंदिरात पूजेसाठी गेले होते. सकाळी साडेअकरा वाजता ते पूजा संपल्यानंतर त्यांच्या स्कूटरवरुन घरी जाण्यासाठी निघाले होते. आरे कॉलनीतून ते पाईपलाईन रोडने विजयनगर ब्रिजवरुन जात होते.
सर्व्हिस रोडने जाताना पासपोर्ट कार्यालयाजवळ येताच पाण्याने भरलेल्या एका टँकरने त्यांच्या स्कूटरला मागून जोरात धडक दिली होती. या अपघातात रामजी आणि त्यांची पत्नी माघीबेन हे दोघेही जखमी झाले होते. त्यांच्या पत्नीच्या कमरेपासून पायाच्या मांडीवरुन टँकरचे मागचे टायर गेल्याने तिची प्रकृती गंभीर होती. अपघाताची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. दुपारी साडेबारा वाजता माघीबेन यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर रामजी पटेल यांच्यावर तिथे उपचार करण्यात आले.
अपघातानंतर टँकरचालक जखमी दोघांनाही कुठलीही वैद्यकीय मदत तसेच पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. याप्रकरणी रामजी पटेल यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसांनी टॅकरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस तर अन्य एका वयोवृद्धाला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. टँकरचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून या क्रमांकावरुन पळून गेलेल्या चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.