टेम्पोच्या धडकेने 28 वर्षांच्या पादचारी तरुणाचा मृत्यू

टेम्पोचालकास अटक व जामिनावर सुटका

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 ऑगस्ट 2025
मुंबई, – समोरुन भरवेगात जाणार्‍या एका टेम्पोच्या धडकेने भरतनाथ पैर बिस्ट या 28 वर्षांच्या पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी टेम्पोचालक नमीश हनुमंता वाल्मिकी (37) याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडून देण्यात आले आहे. अपघातातील टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

हा अपघात मंगळवारी रात्री अकरा वाजता अंधेरीतील विरा देसाई रोड, आझादनगर क्रमांक दोन, डॉमिनोझ पिझासमोर झाला. गोवर्धन दत्तू अर्जुन हे माहीम येथे राहत असून आंबोली पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजता ते रात्रपाळीवर हजर झाले होते. रात्री उशिरा ते त्यांच्या सहकार्‍यासोबत परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना डॉमिनोझ पिझासमोर अपघात झाला असून पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल प्राप्त झाला होता. त्यामुळे ते त्यांच्या सहकार्‍यासोबत तिथे दाखल झाले होते. घटनास्थळी पोलिसांना एक टेम्पो तसेच बाजूलाच तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले.

जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तपासात मृत तरुणाचे नाव भरतनाथ बिस्ट असल्याचे समजले. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता तो आझादनगर मेट्रो स्टेशनकडून विरा देसाईच्या दिशेने पायी चालत जात होता. डॉमिनोझ पिझासमोरुन जाताना त्याला भरवेगात समोरुन येणार्‍या एका टेम्पोने धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर आरोपी टेम्पोचालक नमीश वाल्मिकी याला पोलिसांनी चौकशीसाठी आले होते. याप्रकरणी गोवर्धन अर्जुन यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका पादचारी तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच नमीश वाल्मिकी याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page