मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 डिसेंबर 2025
मुंबई, – शाळेच्या मिनी बसच्या धडकेने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका 78 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. उषा बोलार असे या मृत वयोवृद्ध महिलेचे नाव असून अपघातानंतर पळून गेलेल्या बसचालकाला काही तासांत अंधैरी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले.
हा अपघात शुक्रवारी 28 नोव्हेंबरला सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास अंधेरीतील तेल्ली गल्ली, रमेश मोरे चौकाजवळ झाला. उषा बोलार ही वयोवृद्ध महिला तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहते. ती नियमित सकाळी मार्निंग वॉकसाठी जात होती. शुक्रवारी 28 नोव्हेंबरला ती नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून निघाली होती. सकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास ती तेली गल्लीतून पायी चालत जात होती. यावेळी तेथून भरवेगात जाणार्या शाळेच्या मिनी बसने तिला जोरात धडक दिली. त्यात बसच्या मागच्या चाकाखाली आल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती.
हा प्रकार तिथे गस्त घालणार्या एका पोलीस शिपायाच्या लक्षात येताच त्याने घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या महिलेला तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. तिच्या मोबाईलवरुन तिच्या पालकांना नंतर अपघाताची माहिती देण्यात आली होती.
अपघातानंतर बसचालक तेथून पळून गेला होता. त्याला काही तासानंतर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघतााच्या वेळेस मिनी बसमध्ये दहा ते बारा मुले होती. या मुलांच्या पालकांना बोलावून नंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते.