पदाचा गैरवापर करुन बँकेच्या दोन कोटीचा अपहार

खाजगी बँकेच्या सहा कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – पदाचा गैरवापर करुन बँकेच्या दोन कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी एका खाजगी बँकेच्या सहा कर्मचार्‍याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सिद्धेश पटनाईक, रुषभ यादव, सागर मिश्रा, अजय यादव, श्यामसुंदर चौहाण आणि विकी शिंदे अशी या सहाजणांची नावे आहेत. या सहाजणांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

सचिन सुरेश राऊत हे अंधेरीतील मधुवन सोसायटीमध्ये राहत असून गेल्या अकरा वर्षांपासून एका खाजगी बॅकेत कामाला आहे. सध्या ते अंधेरीतील एमआयडीसी परिसरातील बँकेत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या बँकेच्या दोन खात्यात फसवणुक झाली होती. बँकेच्या सहा खात्यातील निधी वापरण्याची परवानगी पंधरा कर्मचार्‍यांना आहे. त्यात युपीआय रिकन्सेलशन रिषभ यादव, सागर मिश्रा, अजय यादव, पार्टनर अक्वायरिंग युनिटचा शामशुंदर चौहाण, युपीआय डिस्प्रुट सिद्धेश पटनाईक आणि विकी शिंदे यांचा समावेश आहे. ते सहाजण बँकेचे कर्मचारी आहेत. ३ एप्रिल २०२३ ते ४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत या सहाजणांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन बँकेच्या २ कोटी ५ लाख ३४ हजार ३१२ रुपयांचा परस्पर अपहार करुन ही रक्कम त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती.

सिद्धेश पटनाईकने विकी शिंदे याच्या मदतीने ही रक्कम ट्रान्स्फर केली होती. हा प्रकार नंतर सागर मिश्राच्या लक्षात आला होता. त्याने ही माहिती कोणालाही सांगू नये म्हणून त्याने सागरला २९ लाख ३५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर सागरने एक फाईल बनवून प्रोसेससाठी सिद्धेशला देत होता. अशाच प्रकारे सिद्धेशने इतर कर्मचार्‍यांना हाताशी धरुन हा आर्थिक घोटाळा केला होता. बँक कर्मचार्‍यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन पैशांचा अपहार केल्याचे अलीकडेच काही वरिष्ठ अधिकार्‍यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची बँकेकडून चौकशी करण्यात आली होती. त्यात सिद्धेश पटनाईकने इतर पाच कर्मचार्‍यांच्या मदतीने दोन कोटी पाच कोटीचा परस्पर अपहार करुन बँकेची फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.

हा चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन सचिन राऊत यांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात तथ्य असल्याचे आढळून येताच सिद्धेश पटनाईक, रुषभ यादव, सागर मिश्रा, अजय यादव, श्यामसुंदर चौहाण आणि विकी शिंदे या सहाजणांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सहाही कर्मचार्‍यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page