स्ट्रग्लर अभिनेत्रीकडे पैशांची मागणी करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा
सोशल मिडीयावर अश्लील फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 जून 2025
मुंबई, – वेबसिरीजमध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका देण्याची बतावणी करुन एका स्ट्रग्लर अभिनेत्री तरुणीशी जवळीक साधून तिचे अश्लील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यात भावेश, शिवम अग्रवाल व इतर दोन तरुणांचा समावेश आहे. मोबाईल सीडीआरवरुन आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
18 वर्षांची तक्रारदार तरुणी ही मूळची बिहारच्या पटना शहराची रहिवाशी असून ती अंधेरी परिसरात राहते. तिला बॉलीवूडमध्ये स्वतचे करिअर करायचे होते. या करिअरसह ती तिचे शिक्षण पूर्ण करते. सध्या ती पनवेल येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. बुधवारी 11 जूनला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला भावेश नावाच्या एका व्यक्तीने व्हॉटअप कॉल केला होता. त्याने तो एक वेबसिरीजची निर्मिती करत असून तो वेबसिरीजचा निर्माता आहे. त्याचा जी. एम स्टुडिओ नावाचा स्टुडिओ असून याच स्टुडिओमध्ये लवकरच वेबसिरीजचे काम सुरु होणार आहे. त्यासाठी तिची मुख्य अभिनेत्री तसेच शिवम अग्रवालची मुख्य अभिनेता म्हणून निवड झाली असून वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी राहुल पटेल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे असे सांगितले.
त्याने तिची माहितीसह अनुभवाबाबत विचारणा केली होती. त्यामुळे तिने त्याला तिची वैयक्तिक माहितीसह तिचे युट्यूबवरील लिंक पाठविली होती. या लिंकवरुन तिचे व्हिडीओ त्यांना पाहता येत होते. दोन दिवसांनी भावेशने तिला पुन्हा कॉल करुन तिला दोन दिवसांत वेबसिरीजचे काम सुरु होणार असल्याचे सांगितले. याच दरम्यान त्याने तिच्याकडे विमानाच्या तिकिटासाठी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने विमान तिकिटासह करारासाठी त्याला सुमारे दहा हजार रुपये पाठविले होते. याच दरम्यान त्याने तिला शिवमसोबत एकत्र चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचा सल्ल दिला. जेणेकरुन तुम्ही एकमेकांना समजून घेऊ शकाल असे सांगितले.
शिवम हा चर्चगेट येथे राहत असल्याने ती त्याला भेटण्यासाठी 13 जूनला तिथे गेली होती. त्यानंतर या दोघांनी मूव्ही आयनॉक्स येथे चित्रपट पाहिला होता. यावेळी त्याने तिकिट काऊंटरवर स्वतचे नाव शिवमऐवजी भावेश असल्याचे सांगितले होते. चित्रपट पाहिल्यानंतर तो तिला घरी सोडण्यासाठी आला होता. काही वेळानंतर तिला भावेशने कॉल करुन शिवम अद्याप घरी गेला नसून त्याला कॉल करुन भेट असे सांगितले. मात्र तिने त्याला भेटण्यास नकार दिला. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने त्याला ब्लॉक केले होते. रविवारी तिला एका अज्ञात व्यक्तीने मॅसेज करुन 40 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. यावेळी त्याने तिचे त्याच्यासोबत काही अश्लील फोटो पाठविले होते.
तिने त्याला पैसे पाठविले नाहीतर तिचे अश्लील फोटो तिच्या कुटुंबियांसह सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. त्यानंतर तो तिला दुसर्या मोबाईलवरुन धमकी देऊ लागला. या घटनेनंतर तिने डी. एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी भावेश, शिवम अग्रवालसह इतर दोघांविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल क्रमांकावरुन या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.