मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 जुलै 2025
मुंबई, – बँकेत कॅशिअर म्हणून कामाला असलेल्या भावाची जळगाव येथून नागपूर तर विवाहीत नर्स असलेल्या बहिणीला परमंट करुन तिची घराजवळ बदली करतो असे सांगून एका ठगाने रायटर व मॉडेल असलेल्या एका तरुणीची बारा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. या मॉडेलच्या तक्रारीवरुन अजीतभाई मधुकर सोनावणे या ठगाविरुद्ध अंधेरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. वैद्यकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन अजीतभाईने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मृणाली राजेंद्र कावळे ही तरुणी रायटर आणि मॉडेल असून ती मूळची नागपूरची रहिवाशी आहे. सध्या ती अंधेरीतील वर्सोवा गावात भाड्याच्या रुममध्ये राहते. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मिडीयावर अजीतभाई सोनावणेशी ओळख झाली होती. तो गुजरातच्या बडौदाचा रहिवाशी असून त्याने तो तिथेच वैद्यकीय विभागात अध्यक्ष म्हणून काम करत असल्याचे सांगितले होते. त्यातून त्यांची चांगली ओळख झाली होती. मृणालीचा राकेश नावाचा भाऊ ऊन तो जळगाव येथील एका नामांकित बँकेत कॅशिअर म्हणून कामाला होता. त्याला त्याची पोस्टिंग जळगाव येथून नागपूरला हवी होती. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु असताना मृणालीने ही बाब अजीतभाईला सांगितली होती. यावेळी त्याने तिला तिच्या भावाची नागपूर येथे बदली करतो असे सांगितले होते.
याच दरम्यान तिने त्याला तिची बहिण रोशनी नितेश अदमाणे हिच्याविषयी माहिती दिली होती. ती नर्स म्हणून काम करत असून सध्या ती गोंदिया येथील हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. तिला कायमस्वरुपी नोकरीसह तिची घराजवळ बदली हवी होती. त्यासाठी त्याने तिला होकार देत तिला परमंट नोकरीचे लेटरसह घराजवळ बदली करुन देतो असे सांगितले होते. या दोन्ही कामासाठी त्याने तिच्याकडून प्रत्येकी सहा लाखांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याला भावासाठी 3 लाख 71 हजार तर बहिणीसाठी 4 लाख 46 हजार रुपये दिले होते. काही दिवसांनी त्याने तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली होती. त्यामुळे तिने त्याला जून ते ऑगस्ट 2024 दरम्यान आणखीन चार लाख रुपये दिले होते.
अशा प्रकारे नोव्हेंबर 2023 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत तिने भावासह बहिणीच्या बदलीसाठी त्याला बारा लाख सतरा हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांची बदली केली नाही. विचारणा केल्यानंतर तो विविध कारण सांगून तिला टाळण्याचा प्रयत्न करत होता. हा संपूर्ण आर्थिक व्यवसाय अंधेरीतील एका हॉटेलमध्ये झाला होता. त्यामुळे तिने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अजीतभाई सोनावणे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. वैद्यकीय अधिकारी असल्याची बतावणी करुन अजीतभाईने अशाच प्रकारे इतर फसवणुकीचे गुन्हे केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.