मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जानेवारी २०२५
मुंबई, – दिडशे रुपये पाठवून एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल करुन पाठविलेल्या लिंकद्वारे विविध टास्क देऊन एका महिलेला अज्ञात सायबर ठगाने आठ लाख सतरा हजार रुपयांना गंडा घातला. जास्त कमिशनच्या नावाने टास्क देऊन फसवणुक झाल्याचे उघडकीस या महिलेने अंधेरी पोलिसात अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
४२ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी येथे राहत असून एका खाजगी कुरिअर कंपनीत कामाला आहे. ११ जानेवारीला तिला टेलिग्राम अकाऊंटवर एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तिचा मोबाईलसह युपीआय क्रमांक मागितला होता. त्यामुळे तिने त्याला तिचा मोबाईलसह युपीआय क्रमंाक दिला होता. त्यानंतर व्यक्तीने तिला दिडशे रुपये पाठविले होते. दिडशे रुपये जमा होताच तिला बँकेतून एक मॅसेज आला होता. त्यानतर या व्यक्तीने तिला एक लिंक पाठवून तिला त्यांच्या ग्रुपमध्ये सामिल होण्याची विनंती केली होती. त्यामुळे तिने ती लिंक ओपन करुन संबंधित ग्रुपमध्ये जॉईन झाली होती. याच ग्रुपमध्ये तिला काही टास्क देण्यात आले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिला कमिशन देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यामुळे तिने त्याने दिलेले सर्व टास्क पूर्ण केले होते. ते टास्क पूर्ण केल्यानंतर तिच्या बँक खात्यात पैसे जमा होत होते. त्यानंतर तिला काही टास्कमध्ये गुंतवणुक करण्यास सांगण्यात आले होते.
सुरुवातीला तिने नकार दिला, मात्र या व्यक्तीने या टास्कच्या माध्यमातून तिला जास्त कमिशनचे आमिष दाखविले होते. त्यामुळे तिने विविध टास्कसाठी काही रक्कम ट्रान्स्फर केले होते. त्याने दिलेले टास्क तिने पूर्ण केले होते. मात्र टास्क पूर्ण करुनही तिला तिची मूळ रक्कम तसेच कमिशनची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे तिने विचारणा सुरु केली होती.यावेळी अर्जुन बाजवा या व्यक्तीने ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे तिने त्याला दिड लाख, एक लाख आणि पन्नास हजार रुपये पाठविले होते. मात्र ही रक्कम पाठवूनही अर्जुननेतिचा क्रेडिट स्कोअर कमी असल्याचे सांगून तिला आणखीन साडेचार लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र तिने त्याला पैसे पाठविण्यास नकार दिला.
अशा प्रकारे दिडशे रुपये पाठवून अज्ञात व्यक्तीने तक्रारदार महिलेला लिंक पाठवून एका व्हॉटअप ग्रुपमध्ये सामिल केले, तिला विविध टास्क देऊन सुरुवातीला कमिशनची रक्कम देऊन तिचा विश्वास संपादन केला आणि नंतर तिला जास्त कमिशनचे आमिष दाखवून तिची आठ लाख सतरा हजाराची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या सायबर ठगाचा शोध सुरु केला आहे.