मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ डिसेंबर २०२४
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका ७० वर्षांच्या वयोवृद्धेसह दोन महिलांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संगीता साईनाथ कावळे (३१) व लिला जॉर्ज एडवर्ड फर्नाडिस (७०) यांचा समावेश आहे. दहिसर आणि अंधेरी परिसरात दोन्ही अपघातात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी आणि एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे. यातील एका गुन्ह्यांतील आरोपी टेम्पोचालक मोहम्मद सल्लाउद्दीन जाफीर अन्सारी (५०) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली तर दुसर्या बाईकस्वाराचा एमएचबी पोलीस शोध घेत आहे.
पहिला अपघात रविवारी सकाळी साडेनऊ वाजता दहिसर येथील कांदरपाडा, हॉट बन्स केक शॉपसमोर झाला. गॉडवीन जॉर्ज फर्नाडिस हे दहिसर येथे राहत असून फिल्म ऍनिमेशनचे काम करतात. मृत लिला ही त्यांची आई असून तिला मधुमेहासह रक्तदाबाचा त्रास होता. तिच्यावर बोरिवलीतील स्टॅर्लिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अनेकदा घरातील किरकोळ सामान आणण्यासाठी ती दुकानात जात होती. रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता ती नेहमीप्रमाणे बेकरीमधून पाव आणि ब्रेड आणण्यासाठी गेली होती. बेकरीच्या दिशेने जात रस्ता क्रॉस करताना तिला एका भरवेगात जाणार्या बाईकने धडक दिली होती. अपघातात जखमी झालेल्या लिला यांना तातडीने सथानिक लोकांनी रिक्षातून एम. एम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला नंतर करुणा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिथेच तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान दुपारी एक वाजता तिचा मृत्यू झाला. अपघतााची माहिती मिळताच एमएचबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपासात ही बाईक रतनकुमार सोनी नावाचा एक व्यक्ती चालवत होता. बाईक चालवताना त्याने मद्यप्राशन केले होते. त्यामुळे गॉडवीन फर्नाडिस यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रतनकुमार सोनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसरा अपघात सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता अंधेरीतील एमआयडीसी, कोंडिविटा रोड, चुनावाला कंपाऊंडसमोर झाला. साईनाथ मारोती कावळे हे अंधेरीतील एमआयडीसी परिसरात राहतात. ते अंधेरीतील डी. एन नगर परिसरातील एका खाजगी कंपनीत तर त्यांची पत्नी सिस्टेम प्रिंटर्समध्ये पार्टटाईम कामाला आहे. सोमवारी सायंकाळी सव्वासात वाजता संगीता ही कामावरुन घरी येत होती. यावेळी गेटबाहेरुन येताना तेथून जाणार्या एका टेम्पोने तिला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघातानंतर टेम्पोचालक तिला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. जखमी झालेल्या संगीताला स्थानिक लोकांनी आधी मुकूंद व नंतर सेव्हन हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर घटनास्थळी गेलेल्या एमआयडीसी पोलिसांनी साईनाथ कावळे यांची जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी टेम्पोचालक मोहम्मद सल्लाउद्दीनविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्यात आल्यानंतर तिथे मोहम्द सल्लाउद्दीन आला होता. यावेळी त्याला पोलिसांनी अटक केली.