मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील एका नामांकित बिल्डरला २५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकाविणार्या एका रेकॉर्डवरील महिलेसह दोघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली. सपना वजीर ऊर्फ लुबना अझान वजीर आणि जितेंद्र जोशी अशी या दोघांची नावे आहेत. यातील सपना वजीर ही सराईत ब्लॅकमेलर आरोपी महिला असून तिच्यावर अशाच प्रकारच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. तिने आतापर्यंत अनेकांना ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिली आहे. खंडणीची रक्कम दिली नाही म्हणून तिने दोघांविरुद्ध बोगस लैगिंक अत्याचारासह विनयभंगाची तक्रार केली होती. सपनाने तक्रारदार बिल्डरला लैगिंक अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यांत तसेच आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल करुन समाजात बदनामीची धमकी दिल्याचा आरोप आहे. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
५५ वर्षांचे तक्रारदार व्यवसायाने बिल्डर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवलीतील चिकूवाडी परिसरात राहतात. त्यांचे अंधेरीतील पानिपत चौक, नागरदास रोडवर एक बांधकाम साईट आहे. जितेंद्र जोशी हा त्यांचा गेल्या बारा वर्षांपासून परिचित असून तो त्यांच्या घरासह कार्यालयात पूजापाठ करण्यासाठी येत होता. त्याच्यामार्फत जानेवारी २०२४ रोजी त्यांची सपना वजीरशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते दोघेही चांगले मित्र झाले होते. त्यांच्यात मैत्रीपूर्ण सबंध निर्माण झाले होते. याच दरम्यान त्यांनी तिच्या एका प्रोजेक्टमध्ये आर्थिक मदत केली होती. काही दिवसांनी तिने त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ते तिच्यापासून काही अंतर ठेवून राहत होते. काही दिवसांपूर्वी तिने तिची प्रकृती बिघडल्याने सांगून त्यांच्यासह जितेंद्र जोशीला तिच्या अंधेरीतील वर्सोवा-यारी रोडवरील घरी बोलाविले होते. मात्र तिथे गेल्यानंतर ती ठणठणीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे ते तिच्या घरातून निघून गेले होते.
याच गोष्टींचा फायदा घेऊन तिने त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तिच्या घरी येऊन तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचाराचा प्रयत्न केला. तिला किस करुन तिचा विनयभंग केला असे सांगून ब्लॅकमेल करु लागली. पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे सतत २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करु लागली. मात्र तिने तिच्या धमक्यांना भिक घातली नाही. तरीही ती त्यांच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराची खोटी केस दाखल करुन जिवाचे बरे-वाईट करुन तिच्या आत्महत्येला तेच जबाबदार आहेत अशी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देत होती. पैसे दिले नाहीतर समाजात त्यांची बदनामी करण्याची सतत धमकी देत होती. तिच्याकडून खंडणीसाठी सुरु असलेल्या ब्लॅकमेलला ते प्रचंड कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार अंधेरी पोलिसांना सांगून सपना वजीर आणि जितेंद्र जोशी यांच्याविरुद्घ तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच या दोघांना पोलिसांनी अटक केली. चौकशीत सपना वजीर ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध गुन्हे शाखा, सांताक्रुज, वाकोला, जुहू, विलेपार्ले पोलीस ठाण्यात अशाच काही गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच तिच्याविरुद्ध अंधेरी आणि शहर सत्र न्यायालयात काहींनी याचिका दाखल केली होती. तिने दोन व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह लैगिंक अत्याचाराची तक्रार केली होती. मात्र या दोन्ही तक्रारी बोगस असल्याचे उघडकीस आले. या दोघांकडे ब्लॅकमेल करुन पैशांची तिने मागणी केली होती. त्यांनी पैसे दिले नाही म्हणून तिने त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या गुन्ह्यांत तिला जितेंद्र जोशी याने मदत केल्याचे उघडकीस आल्याने त्याला या गुन्ह्यांत सहआरोपी करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.