मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 जुलै 2025
मुंबई, – अश्लील फोटो व्हायरलची धमकी देऊन एका कॉलेज तरुणीला ब्लॅकमेल करुन तिला खंडणीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन कॉलेज तरुणाविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन सिद्धार्थ नावाच्या एका 20 वर्षांच्या आरोपीला अटक केली. आरोपी हा पिडीत मुलीचा प्रियकर असून त्याने तिचे अश्लील फोटो त्याचा मित्राला दिले होते. याच फोटोवरुन तो तिला ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
21 वर्षांची पिडीत तरुणी ही मूळची हरियाणाच्या गुरग्रामची रहिवाशी आहे. सध्य ती अंधेरी परिसरात राहत असून एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेते. तिचा सिद्धार्थ हा मित्र असून त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याने तिला प्रपोज करुन तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. सिद्धार्थ हा आवडत असल्याने तिने त्याला होकार दिला होता. याच दरम्यान त्यांच्यात स्वखुशीने अनेकदा शारीरिक संबंध आले होते. या संबंधाचे सिद्धार्थने काही फोटो त्याच्या मोबाईलवरुन काढले होते. ते फोटो त्याने त्याचा द्विवितला दिले होते. या फोटोवरुन तो पिडीत तरुणीला ब्लॅकमेल करत होता.
तिचे अश्लील फोटो त्याच्याकडे असल्याचे सांगून तो तिला जिवे मारण्याची धमकी देत होता. तसेच तिच्याकडून सतत खंडणीची मागणी करत होता. बदनामीसह जिवाच्या भीतीने तिने त्याला वेळोवेळी पैसे दिले होते. तरीही तो तिला सतत पैशांसाठी धमकी देत होता. हा प्रकार अलीकडेच पिडीत मुलीच्या आईला समजला होता. यावेळी आरोपीने तिच्या आईवर लैगिंक अत्याचार करण्याची धमकी दिली होती. आरोपींच्या सततच्या ब्लॅकमेलसह खंडणीसाठी देण्यात येणार्या धमकीला कंटाळून या तरुणीने घडलेला प्रकार डी. एन नगर पोलिसांना सांगितला होता.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत पिडीत मुलीच्या प्रियकरासह त्याच्या मित्राविरुद्ध लैगिंक अत्याचारासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच 20 वर्षांच्या आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत द्विवितला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.