बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कॅनेडियन नागरिकांची फसवणुक
अंधेरीतील कॉल सेंटरवरील कारवाईत पाचजणांना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2025
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून कॅनेडियन नागरिकांना शंभर डॉलरचे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरवरील कारवाईत पोलिसांनी मॅनेजरसह पाचजणांना अटक केली आहे. अझहर मुसा कादरी, आकाश शाहू काळे, मोहम्मद शहानवाज रईस शेख, गोलुसिंग पप्पूसिंग दिपपाल आणि मुस्तफा कैसर चितलवाला अशी या पाचजणांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
मुंबई शहरात बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून काही विदेशी नागरिकांची फसवणुक होत असल्याच काही तक्रारी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अशा बोगस कॉल सेंटरवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिसांना देण्यात आले होते. या आदेशांनतर मुंबई शहरात सुरु असलेल्या काही बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला होता. मात्र ही कारवाई सुरु असताना अंधेरी येथे अशाच प्रकारे एक कॉल सेंटर सुरु असून या कॉल सेंटरच्या कॅनेडियन नागरिकांची फसवणुक होत असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी या कॉल सेंटरची माहिती काढली होती.
शुक्रवारी रात्री युनिट दहाच्या विशेष पथकाने अंधेरीतील अंधेरी-कुर्ला रोड, मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, इमारत क्रमांक सहाच गाला क्रमांक 138 बी मध्ये छापा टाकला होता. या छाप्यात तिथे एक बोगस कॉल सेंटर सुरु असल्याचे उघडकीस आले. तिथे काम करणारे कर्मचारी स्वतला अॅमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून विदेशी नागरिकांची फसवणुक करत होते. या नागरिकांना आयफोन सोळा प्रो मोबाईल खरेदी केला किंवा खरेदी केला नसल्यास ती ऑर्डर रद्द करण्याचा बहाणा करुन कॉल केला जात होता. त्यांच्यासोबत फसवणुक झाल्याचे सांगून ही बाब गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांचा कॉल कॅनेडियन सरकारी क्राऊन अॅटनी कोर्ट हाऊस येथे जोडला जात असल्याचे सांगून त्यांना शंभर डॉलरचे गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास प्रवृत्त केले जात होते.
अशा प्रकारे या आरोपींनी अनेक कॅनेडियन नागरिकांची लाखो रुपयांची फसवणुक केली होती. या कॉल सेंटरचा मालक शैलेश डोबरिया असून तो गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी आहे. कॉल सेंटरमधील दैनदिन घडामोडीची माहिती त्याला कॉलद्वारे दिली जात होती. शैलेश हा सोळा अंकी क्रमांकाचा गैरफायदा कॅनेडियन नागरिकांना गिफ्ट कार्डसाठी स्वतच्या बँक खात्याची माहिती देत होता. फसवणुकीची ही रक्कम त्याच्याच बँक खात्यात जमा केली जात होती. तिथे अझहर कादरी हा मॅनेजर म्हणून काम करत होता. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल फोन, लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्डडिस्क आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याच गुन्ह्यांत नंतर अझहर कादरीसह इतर चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता, आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत कॉल सेंटरचा मालक शैलेश डोबारिया याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.