अस्तिस्तावात नसलेल्या जागेवर इमारत बांधकामाचे प्रपोजल ठेवले
फ्लॅट बुकींगसाठी घेतलेल्या दहा कोटीचा अपहार करुन फसवणुक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 डिसेंबर 2025
मुंबई, – अंधेरी परिसरात अस्तित्वात नसलेली मालमत्ता स्वतच्या मालकीची असल्याची बतावणी करुन इमारत बांधकामाच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त बँक प्रबंधकासह नव्वद फ्लॅटधारकांची एका खाजगी बांधकाम कंपनीने सुमारे दहा कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी हर्षा रविंद्र जडाव आणि जयेश वालजी बागडा या दोघांविरुद्ध अंधेरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हर्षा ही मनहश्री निर्माण बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सची संचालिका तर जयेश हा मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल झाल्याने या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.
68 वर्षांचे रमाकांत सोनू पवार हे जोगेश्वरी येथे राहत असून ते एका नामांकित बँकेतून मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचा एक मुलगा विदेशात राहतो तर मुलीचे लग्न झाले आहे. जानेवारी 2023 रोजी त्यांना त्यांच्या मित्रांकडून मनहश्री निर्माण बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सकडून स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या पैशांतून मुलीला एक फ्लॅट द्यायचा होता, त्यामुळे ते त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत मनहश्री निर्माण कंपनीच्या अंधेरीतील कार्यालयात चौकशी केली होती. यावेळी कंपनीचे मॅनेजर जयेश बागडा यांनी त्यांना त्यांच्या प्रोजेक्टची माहिती देत त्यांचे विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्प सुरु असल्याचे सांगितले होते.
या प्रोजेक्टमध्ये आधी फ्लॅट बुकींग केल्यास त्यांना सवलतीच्या दरात फ्लॅट दिले जात असल्याचे सांगून त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. यावेळी त्याने त्यांची ओळख कंपनीचे मालक व संचालक रविंद्र जडावशी करुन दिली होती. त्याने त्यांना कंपनीकडून अंधेरीतील काही प्रोजेक्टची माहिती दिली होती. तसेच त्यांना 269 चौ. फुटाचा रुम 31 लाखांमध्ये देण्याचे आमिष दाखविले होते. बारा लाख रुपये भरल्यानंतर उर्वरित रक्कम फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर देण्यास सांगितले होते. त्यानतर त्यांनी त्याला बारा लाखांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत कंपनीने एक करार केला होता.
या करारात त्यांना अठरा महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य करण्यात आले होते. हा प्रकार त्यांनी त्यांच्या परिचित मित्रांना सांगितला होता. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांच्या मित्रांनीही रविंद्र जडाव, त्यांची पत्नी हर्षा जडाव, जयेश बागडा यांची भेट घेऊन त्यांच्या मालाड आणि जोगेश्वरीतील प्रोजेक्टमध्ये प्रत्येकी एक फ्लॅट बुक केला होता. काही महिन्यानंतर त्यांनी फ्लॅटच्या किंमतीत वाढ केली होती, त्यामुळे फ्लॅटसाठी अतिरिक्त रक्कम भरावी लागणार होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्यातील करार रद्द करुन फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. याच दरम्यान रविंद्र जडाव यांचे निधन झाले होते. यावेळी हर्षा आणि जयेशने सर्वांना पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. चौकशीदरम्यान रमाकांत पवार यांच्यासह 89 जणांनी कंपनीत फ्लॅटसाठी 10 कोटी 17 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. विशेष म्हणजे अंधेरी येथे अस्तित्वात नसलेली मालमत्ता त्यांच्या मालकीची असल्याची बतावणी करुन त्यांनी सर्वांना या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास स्वस्तात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्याविरुद्ध दिडोंशी सेशन कोर्टात एक सिव्हिल सूट फाईल करुन हर्षा, तिची मुलगी धर्मी, मुलगा कुमार काव्या आणि जयेश यांना नोटीस पाठविली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी रविंद्र जडाव, हर्षा जडाव आणि जयेश बागडा यांच्यविरुद्ध अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात संबंधित व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. रविंद्र जडाव यांचे निधन झाल्याने हर्षा जडाव आणि जयेश बागडा यांच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून याच गुन्ह्यांत या दोघांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे.