मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 जून 2025
मुंबई, – दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन घरफोडी करणार्या तीनजणांच्या एका टोळीला अंधेरी पोलिसांनी अटक केली. अरमान नजीर शेख, अनिकेत अंकुश नांदे आणि साहिल आनंद शिंदे अशी या तिघांची नावे असून ते सर्वजण अंधेरीतील रहिवाशी आहे. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तिघांकडून लवकरच चोरीचा हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धनंजय विद्याधर दुबे हे 63 वर्षांचे वयोवृद्ध अंधेरीतील वास्तुलाभ राजमाता मार्ग, सुनिता हॉस्पिटलजवळ राहतात. 30 एप्रिलला रात्री त्यांच्या नागरदास क्रॉस रोड, मिश्रा कुंज इमारतीमध्ये असलेल्या घरी घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. दुसर्या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती.
याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परकाळे, सुर्वे, पोलीस हवालदार सूर्यवंशी, पिसाळ, शिंदे, पोलीस शिपाई म्हात्रे, लोंढे, पाटील, मोरे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील शंभरहून अधिक सीसीटिव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता.
या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन नायगाव येथील वाकीपाडा परिसरातून पोलिसांनी अरमान शेख, अनिकेत नांदे आणि साहिल शिंदे या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. ते तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्या अटकेने अंधेरी आणि नेहरुनगर पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.