मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 सप्टेंबर 2025
मुंबई, – बारा दिवसांपूर्वी अंधेरीतील एका मोबाईल शॉपमध्ये झालेल्या घरफोडीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मोईनुद्दीन नझीम शेख, साबीर मुस्तफा शेख, अमरुद्दीन अलीहसन शेख आणि प्रभू भागलू चौधरी अशी या चौघांची नावे असून ते चौघेही साहेबगंज आणि कोलकाता येथील रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे सव्वालाखांचे दिडशेहून घड्याळ जप्त केले असून उर्वरित मोबाईलसह कॅश लवकरच हस्तगत केली जाणार आहे. अटकेनंतर चारही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने सोमवार 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यातील तक्रारदार व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचे अंधेरी येथे एक मोबाईल शॉप आहे. 7 सप्टेंबरला ते नेहमीप्रमाणे शॉप बंद करुन घरी गेले होते. दुसर्या दिवशी सकाळी दहा वाजता ते मोबाईल शॉपमध्ये आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या शॉपमध्ये घरफोडी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने दुकानातील संरक्षण ग्रील तोडून आत प्रवेश केला होता. दुकानातील 150 विविध कंपनीचे घड्याळ, 10 मोबाईल आणि 40 हजाराची कॅश असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, समाधान सुपे, पोलीस हवालदार कांबळे, शिंदे, पुजारी, कांबरी, पोलीस शिपाई म्हात्रे सुशांत पाटील, लोंढे, विजय पाटील, शिंदे, गवळी, टरके, तिघोटे, नरबट, मोरे, विशाल पिसाळ यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. आरोपींची ओळख पटल्यानंतर ते विविध ठिकाणी स्वतचे अस्तित्व लपवून राहत होते. मोबाईलचा जास्त वापर करत नव्हते, त्यामुळे त्यांचे लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी येत होते.
अखेर सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी दहा दिवस विविध ठिकाणी पाळत ठेवून मोईनुद्दीन शेख, साबीर शेख, अमरुद्दीन शेख आणि प्रभू चौधरी यांना डोंगरी आणि तुर्भे येथून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांच्याकडून चोरी मोबाईल हस्तगत केले आहेत. उर्वरित मोबाईल आणि कॅश लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर त्यांना अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.