मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जानेवारी २०२५
मुंबई, – अंधेरी येथे राहणार्या एका महिला डॉक्टरच्या घरी चोरी करुन पळून गेलेल्या दुकलीस अंधेरी पोलिसांनी अटक केली. मनोज चितालिया आणि मोहसीन कादर बुलोच अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोनाली रोहित चैंबळ या ५१ वर्षांच्या महिला डॉक्टर आहे. त्यात त्यांच्या पती, सासू आणि मुलांसोबत अंधेरीतील सहार रोड, तिरुपती सोसायटीमध्ये राहतात. सध्या त्या एम्का हाऊस प्रायव्हेट हेल्थ केअर या ठिकाणी सहाय्यक डॉक्टर म्हणून कामाला आहेत. त्यांचे पती रोहित हे महाराष्ट्र हाऊसिंगमधून निवृत्त झाले असून दोन्ही मुले शिक्षण घेतात. ३ जानेवारी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश केला होता. कपाटातील ३ लाख ६८ हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन चोरट्याने पलायन केले होते. त्यांचा मुलगा दुपारी पाऊणच्या सुमारास घरी आल्यानंतर त्याला हा प्रकार समजला होता. त्यामुळे त्याने ही माहिती फोनवरुन त्यांना दिली होती. चोरी करुन पळून जाताना त्याने एका अज्ञात व्यक्तीला पाहिले होते. ही माहिती नंतर सोनाली चैंबळ हिने अंधेरी पोलिसांना दिली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शनिवारी मनोज आणि मोहसीन या दोघांना संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.