25 लाखांचे दागिन्यासह कॅश चोरी करुन नोकरांचे पलायन
अंधेरी-काळबादेवीतील घटना; नोकरांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2025
मुंबई, – सुमारे 25 लाखांचे हिरेजडीत दागिन्यांसह कॅश घेऊन दोन नोकरांनी पलायन केल्याची घटना अंधेरी आणि काळबादेवी परिसरात उघडकीस आली आहे. सिमंत मलिक आणि अश्वनीकुमार सुखवीर सिंग अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी डी. एन नगर आणि एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद केली असून पळून गेलेल्या नोकरांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
माया अनंत कदम ही 72 वर्षांची वयोवृद्ध महिला अंधेरीतील दाऊदबाग, रामबाग, सोनाली सहकारी सोसायटीमध्ये तिचे पती अनंत कदम यांच्यासोबत राहते. तिला दोन मुले असून मोठा मुलगा अमेरिका तर दुसरा अंधेरीतील विरा देसाई रोडवर राहतो. तिच्या पतीला पॅरालेसीसचा आजार असून ते झोपून असतात. त्यामुळे तिने बालुशाही या तरुणाला केअरटेकर म्हणून कामावर ठेवले होते. मात्र तो गावी गेल्याने त्याच्या जागी त्याने अश्वनीकुमारला 29 वर्षांच्या तरुणाला कामावर ठेवले होते. गेल्या तीन दिवसांपासून तो त्यांच्याकडे कामासाठी येत होता. रविवारी दुपारी दोन वाजता अश्वनीकुमार हा तिच्याकडे रडत आला आणि त्याने त्याच्या आईचे निधन झाले आहे. त्यामुळे त्याला तातडीने गावी जावे लागणार आहे असे सांगितले. त्यानंतर तो त्याची बॅग घेऊन घरातून निघून गेला.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने कपाटातील सर्व दागिन्यांची पाहणी केली होती. यावेळी तिला कपाटातील हिरेजडीत दागिने आणि कॅश दिसून आली नाही. संपूर्ण कपाटाची पाहणी केल्यानंतर तिला कपाटातून हिरेजडीत सोन्याचे दागिने आणि दहा हजाराची कॅश असा सतरा लाख पत्तीस हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. अश्वनीकुमार यानेच तिच्या घरात चोरी करुन आईच्या मृत्यूची खोटी माहिती सांगून पलायन केल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यानंतर तिने ही माहिती डी. एन नगर पोलिसांना दिली.
दुसरी घटना पोफळवाडी परिसरात घडली.सुदर्शन गैरहरी बेरा हे वयोवृद्ध व्यापारी ग्रॅटरोड येथे राहत असून त्यांचा दागिने बनविण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात सिमंत मलिक हा कारागिर गेल्या बारा वर्षांपासून कामाला होता. डिसेंबर 2024 रोजी तो कारखान्यातील साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पळून गेला होता. यावेळी सुदर्शन हे त्यांच्या कुटुंबियांसोबत सहलीसाठी गेले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सिमंतला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यानंतर सिमंतविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या नोकरांचा शोध सुरु केला आहे.