लोखंडी सळई पडून नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

मित्रासोबत मदतनीस म्हणून मुंबईत आला होता

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 नोव्हेंबर 2025
मुंबई, – अंधेरीतील एका निर्माण इमारतीच्या बांधकाम साईटवर लोखंडी सळई डोक्यात पडून अमर पगारे नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिमेंट ब्लॉक घेऊन आलेल्या मित्रासोबत तो मदतनीस म्हणून मुंबईत आला होता. वॉशरुममध्ये फे्रश होण्यासाठी जाताना सातव्या मजल्यावरुन पडलेल्या सळई डोक्यात पडून त्याचा मृत्यूने त्याच्या नाशिक येथे राहणार्‍या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी बांधकाम साईटच्या संबंधित अधिकार्‍याविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना बुधवारी सकाळी अंधेरीतील मरोळ रोडवरील प्रिविलोन या बांधकाम साईटवर घडली. या ठिकाणी बांधकाम सुरु असल्याने कंत्राटदाराने नाशिक येथून सिमेंट ब्लॉक मागविले होते. सकाळी पाच वाजता कंपनीचा चालक सिमेंट ब्लॉक घेऊन अंधेरी येथे आला होता. यावेळी या चालकाने अमरला मदतनीस म्हणून मुंबईत आणले होते. सकाळी ते दोघेही ट्रकमध्ये झोपले होते. बांधकाम साईटवर कामगार आल्यानंतर त्यांनी ट्रकमधून सिमेंट ब्लॉक काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी अमर हा फ्रेश होण्यासाठी इमारतीच्या वॉशरुममध्ये जात होता.

याच दरम्यान सातव्या मजल्यावरुन एक लोखंडी सळई पडून तो जखमी झाला होता. रक्तबंबाळ झालेल्या अमरला तिथे काम करणार्‍या कामगारांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अमरचा चालक मित्राची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या मृत्यूची माहिती त्याच्या नाशिक येथील कुटुंबियांना देण्यात आली आहे. ते गुरुवारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांना सोपविण्यात येणार आहे.

घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर कंत्राटदाराने कामगाराच्या सुरक्षेसाठी योग्य काळजी किंवा खबदारी घेतली नसल्याचे दिसून आले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम साईटच्या अधिकार्‍याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page