मोबाईल चोरी करणार्‍या सराईत टोळीचा पर्दाफाश

चोरीच्या १२० मोबाईलसह तीन आरोपींना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जानेवारी २०२४
मुंबई, – रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांच्या हातातील मोबाईल खेचून मोबाईलवरुन पळून जाणार्‍या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात अंधेरी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोन रेकॉर्डवरील मोबाईल चोरांसह चोरीचे मोबाईल विकत घेणारा रिसव्हर्स अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांकडून पोलिसांनी चोरीचे १२० हून अधिक मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत सुमारे नऊ लाख रुपये आहे. प्रसाद सिताराम गुरव, विकेश ओमप्रकाश उपाध्याय आणि रवी बाबू वाघेला अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या आरोपींच्या अटकेने मोबाईल चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सुधाकुमारी कपिलदेव राणा ही २४ वर्षांची तरुणी बोरिवली परिसरात राहते. ३१ डिसेंबरला ती एका खाजगी कंपनीत मुलाखतीसाठी आली होती. दुपारी पावणेतीन वाजता मुलाखत देऊन ती अंधेरी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होती. प्रसादम हॉटेलजवळ मोबाईल बोलताना ती रस्ता क्रॉस करत होती. यावेळी तिथे ऍक्टिव्हा बाईकवरुन दोन तरुण आले आणि मागे बसलेल्या तरुणाने तिच्या हातातील मोबाईल घेऊन बाईकवरुन पलायन केले होते. तिने आरडाओरड करुन पळून जाणार्‍या तरुणांचा पाठलाग केला, मात्र ते दोघेही पळून गेले होते. त्यानंतर तिने अंधेरी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. शहरात वाढत्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अंधेरी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, शंकर खाडे, पोलीस हवालदार राजेंद्र पेडणेकर, हेमंत सूर्यवंशी, संदिप शिंदे, प्रविण जाधव, पोलीस शिपाई विजय लोंढे, अविनाश कापसे, गोट्या ऊर्फ विवेक म्हात्रे, विजय मोरे, तांत्रिक मदत पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना प्रसाद गुरव आणि विकेश उपाध्याय या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

चौकशीत ते दोघेही अंधेरीतील रहिवाशी असून रेकॉर्डवरील मोबाईल चोर आहे. या दोघांविरुद्ध मोबाईल चोरीचे मुंबईसह इतर शहरात १५० ते २०० हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. बाईकवरुन रेकी केल्यानंतर ते दोघेही रस्त्यावरुन जाणार्‍या पादचार्‍यांचे मोबाईल चोरी करुन बाईकवरुन पळून जात होते. गेल्या काही महिन्यांत त्यांनी १२० हून अधिक मोबाईल चोरीची केल्याची कबुली दिली. चोरीचे मोबाईल ते रवी वाघेला याला विक्री करत होते. त्यानंतर रवी वाघेला याला पोलिसांनी अटक केली. या तिन्ही आरोपीविरुद्ध पोलिसांनी चोरीचे १२० हून अधिक चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. या मोबाईलची किंमत ९ लाख १८ हजार ३०० रुपये इतकी आहे. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कुठलाही पुरावा नसताना पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, शंकर खाडे, पोलीस हवालदार राजेंद्र पेडणेकर, हेमंत सूर्यवंशी, संदिप शिंदे, प्रविण जाधव, पोलीस शिपाई विजय लोंढे, अविनाश कापसे, गोट्या ऊर्फ विवेक म्हात्रे, विजय मोरे, तांत्रिक मदत पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन तिन्ही आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून १२० हून चोरीचे मोबाईल जप्त केले आहे. या पोलीस पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page