ऍसिड हल्ल्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
अंधेरीतील घटना; पळून गेलेल्या आरोपी तरुणाचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ ऑगस्ट २०२४
मुंबई, – ऍसिड हल्ल्याची धमकी देत एकतर्फी प्रेम करणार्या एका तरुणाने सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा भरस्त्यात विनयभंग केल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी २२ वर्षांच्या आरोपीविरुद्ध डी. एन नगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
३५ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत अंधेरी येथे राहते. बुधवारी सकाळी पावणेसात वाजता ती तिच्या लहान मुलीला शाळेत गेली होती. यावेळी तिची पंधरा वर्षांची मुलगी घरातच होती. काही वेळानंतर ती घरापासून काही अंतरावर असलेल्या बाथरुममध्ये गेली होती. यावेळी तिथे २२ वर्षांचा आरोपी आला आणि त्याने तिच्याशी जवळीक निर्माण करुन तिला नकोसा स्पर्श केला होता. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि त्याने तिला प्रतिकार करुन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने तिचा पाठलाग केला आणि तिला रस्त्यात अडविले. यावेळी त्याने तिला त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करायचे आहे. माझ्याशी लग्न केले नाहीतर तर संपूर्ण सोसायटीमध्ये तुझी बदनामी करुन तिचा तमाशा करण्याचे तसेच तिच्यावर ऍसिड हल्ला करण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर तिच्यासह तिच्या आईलाही जिवे मारण्याची धमकी दिली होती. तु माझी झाली नाहीतर तुला अन्य कोणाचीही होऊ देणार नाही असे बोलून तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे ती तेथून पळून घरी आली होती.
घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. या प्रकाराने तिलाही मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने तिला डी. एन नगर पोलीस ठाण्यात आणून तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगिलला. या महिलेच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध ७८, ७९, १२६ (२) भारतीय न्याय सहिता सहकलम ८, १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक तपासात आरोपी हा तक्रारदार महिलेच्या मुलीचा सतत पाठलाग करत होता. त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. त्याने तिला ऍसिड हल्ल्याची धमकी दिल्याने त्याची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे पळून गेलेल्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.