मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सात आणि आठ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंगप्रकरणी एका 58 वर्षांच्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. चॉकलेट देण्याचा बहाणा करुन आरोपीने दोन्ही मुलींशी अश्लील चाळे करुन त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
31 वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी परिसरात राहते. याच परिसरात आरोपी हादेखील राहतो. शनिवारी दुपारी सव्वातीन वाजता तक्रारदार महिलेची सात वर्षांची मुलगी आणि तिची आठ वर्षांची मैत्रिण एकत्र होते. यावेळी तिथे आरोपी आला आणि दोन्ही मुलींना चॉकलेट देण्याचा बहाणा करुन त्यांच्याशी अश्लील चाळे करुन विनयभंग केला होता. या प्रकारानंतर दोन्ही मुली प्रचंड घाबरल्या. घरी आल्यानंतर या मुलींनी तिच्या पालकांना ही माहिती सांगितली.
या माहितीनंतर बळीत मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत त्याला पोलिसांनी अटक केली.