मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – चोरीच्या भंगार सामानाच्या वाटणीवरुन झालेल्या वादातून आकाश वसंत रौनक या २२ वर्षांच्या तरुणाची त्याच्याच मित्राने दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या गिल्बर्ट रॉबर्ट सनिप्रिन्स या आरोपी मित्राला सहार पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मयत आणि आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चोरीसह मारामारीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
निलेश वसंत रौनक हा अंधेरीतील मरोळ पाईपलाईन, साई मंदिराजवळील साईनगर परिसरात राहत असून मृत आकाश हा त्याचा मोठा भाऊ आहे. त्याचे वडिल कारपेंटर असून आकाश मिळेल ते काम करत होता. गिल्बर्ट हा आकाशचा मित्र असून तो नेहमी त्याच्यासोबत राहत होता. या दोघांविरुद्ध चोरीसह मारामारीचे गुन्हे दाखल असून याच गुन्ह्यांत दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. तळोजा जेलमध्ये असताना त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा ते दोघेही भूमिगत मेट्रो कामाच्या ठिकाणी लोखंडी सळ्या आणि बारची चोरी करत होते. भंगारात चोरीचा माल विकून आपसांत पैसे वाटून घेत होते. शुक्रवारी दिवसभर आकाश हा घरी आला नाही. त्यामुळे त्याने त्याच्याविषयी चौकशी सुरु केली होती. मात्र त्याला आकाशची काहीच माहिती समजली नव्हती. शनिवारी रात्री उशिरा आकाशचे दोन मित्र देवेंद्र राजभर आणि बाबू हे त्याच्या घरी आले होते. यावेळी त्याने अंधेरीतील अण्णावाडी, टॅक्सी पार्किंग गेटजवळ आकाश जखमी अवस्थेत पडल्याचे सांगितले. त्यामुळे निलेश हा त्यांच्यासोबत तिथे गेला होता. तोपर्यंत सहार पोलिसांनी जखमी अवस्थेत आकाशला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्या डोक्यावर दगडाने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. दगडामुळे त्याचा चेहरा पूर्णपणे दबला होता.
तपासात गिल्बर्ट आणि आकाश यांच्यात रात्री उशिरा चोरी केलेल्या भंगाराच्या सामानाच्या वाटणीवरुन भांडण झाले होते. या भांडणानंतर गिल्बर्टने आकाशची दगडाने ठेचून हत्या केली होती. हत्येनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे निलेशच्या जबानीवरुन सहार पेालिसांनी गिल्बर्टविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या गिल्बर्टला अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.