मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ फेब्रुवारी २०२५
मुंबई, – जुन्या वादातून सुजीत हरिवंश सिंग या ४१ वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच शेजारी राहणार्या मित्राने तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मित्र सुनिल परशुराम कोकाटे याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता अंधेरीतील सहार रोड, मालाधारी रहिवाशी संघ, यशोधन सोसायटी कार्यालयासमोर घडली. याच परिसरातील मालाधारी रहिवाशी संघाच्या रुम क्रमांक दोनमध्ये पूनम सिंग ही महिला तिचा पती सुजीतसोबत राहते. आरोपी सुनिल हा तिचा परिचित असून तो तिच्या शेजारीच राहतो. सुनिल आणि सुजीत हे चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला हेता. यावेळी सुनिलने सुजीतला जिवे मारण्याची धमकी दिली होती. बुधवारी रात्री उशिरा त्यांच्यात जुन्या कारणावरुन पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात सुनिलने सुजीतवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात त्याच्या छातीला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.
जखमी झालेल्या सुजीतला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना सुजीतचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पूनम सिंग हिने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी सुनिल कोकाटे याच्याविरुद्ध हत्येचा गुंन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुनिलला अंधेरी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.